Last Updated on 22 Aug 2025 10:39 AM by Sanjay Patil/Adhorekhit
गणेशोत्सवासाठी शासनाचा निर्णय मंगळवारी जमा होणार रक्कम
मुंबई । शासकीय कर्मचाऱ्यांचा १ तारखेला होणारा पगार या महिन्यात पाच दिवसाआधीच म्हणजे २६ ऑगस्ट रोजी करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य सरकारने घेतला. गणेशोत्सवामुळे सरकारने राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांना खूशखबर दिली.
गणेशोत्सवाच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी ऑगस्ट महिन्याचा पगार २६ ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारी नोकरदारांचा गणेशोत्सावाचा आनंद द्विगुणीत झाला. गुरुवारी शासन निर्णय काढून १ सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार पाच दिवसआधीच करण्यास मान्यता देण्यात आली.
जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारक आणि कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी मिळणार आहे.
रात्री १२ वाजेपर्यंत देखावे दाखवण्यास परवानगी
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी शेवटचे पाच दिवस परवानगी राहणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिली आहे. याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.











































































