Last Updated on 11 Sep 2025 12:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नियम न पाळणाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई होणार
मुंबई । राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र (Identity Card) दृश्यमान भागावर धारण करणे बंधनकारक असल्याचे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचे परिपत्रक दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आले आहे.
शासनाने यापूर्वी ७ एप्रिल २०१४ रोजीच कार्यालयीन ओळखपत्र धारण करण्याबाबत परिपत्रक काढले होते. तसेच ९ ऑक्टोबर २०२३ रोजीही ही सूचना अधोरेखित करण्यात आली होती. तरीसुद्धा अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित असताना ओळखपत्र न लावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा हा आदेश स्पष्टपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमके निर्देश काय?
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना तसेच कार्यालयात असताना आपले ओळखपत्र दृश्यमान भागावर धारण करणे बंधनकारक आहे.
जे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपस्थित असताना ओळखपत्र धारण करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येईल.
या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांच्यावर राहील.
हेही वाचा – वाळवा तालुक्यात सेवा पंधरवडा अंतर्गत शिवपाणंद रस्ते मोहीम प्रभावीपणे राबवणार
शासनाच्या मते, शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवणे, सुरक्षितता वाढवणे आणि कार्यालयीन कामकाजात शिस्त व पारदर्शकता ठेवणे हे या निर्णयामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख सहज पटावी यासाठीच ही अट कडकपणे लागू करण्यात आली आहे.
कारवाईची जबाबदारी
परिपत्रकानुसार, ओळखपत्र धारण करण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्यावर असेल. त्यामुळे आता प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हा नियम काटेकोरपणे पाळला जात आहे का, यावर लक्ष ठेवणे आवश्यक राहणार आहे.









































































