Last Updated on 10 Oct 2022 1:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
थोडक्यात पण महत्वाचे
- समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन
- हरियाणातील गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार घेत होते
82 वर्षांचे होते मुलायम सिंह
नवी दिल्ली । उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे ते 82 वर्षांचे होते.गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती.अखेर आज सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे.
मुलायम सिंह यादव यांना अचानक प्रकृती बिघडल्यामुळे गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्नशचा त्रास होता. अचानक ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना 22 ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रकृती आणखी खराब झाल्यामुळे त्यांना 1 ऑक्टोबरच्या रात्री आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती. मेदांता हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यांवर उपचार सुरु होते. पण आज सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मुलायम सिंह यादव यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी ट्वीट करत वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली.
बीए,बीटी आणि एम.ए. केलेल्या मुलायम सिंह यांनी राजकारणात उत्तुंग भरारी घेतली. शिक्षकी पेशा सोडून राजकारणात प्रवेश करणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजकारणात सुरुवात करणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी पुढे महत्त्वाची पदे भूषविली.
मुलायम सिंह यांचा अल्पपरिचय
22 नोव्हेंबर 1939 मध्ये उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात जन्म झाला होता.मुलायम सिंह हे तरुणपणी कुस्ती खेळायचे. त्यांनी काही काळ कुस्तीचे मैदानही गाजवले.यानंतर मुलायमसिंह यादव यांनी काहीकाळ प्राध्यापक म्हणून काम केले. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांची नेताजी म्हणून ओळख होती.1967 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार बनले. कायम जमिनीशी नाळ असणारा नेता अशी त्यांची ओळख राहिली.
1992 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती.3 वेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. 1996 ते 1998 दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची जबाबदारीही सांभाळली होती.मागच्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मेनुपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
मुलायम सिंग यादव यांचा प्रवास
1977 मध्ये पहिल्यांदा यूपी सरकारमध्ये मंत्री
1980 जनता दल यूपीचे अध्यक्ष
1996 पहिल्यांदा लोकसभा खासदार
1996 ते 1998 संरक्षणमंत्री
तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री
1) 5 डिसेंबर 1989 ते 24 जून 1991
2) 4 डिसेंबर 1993 ते 3 जानेवारी 1995
3) 29 ऑगस्ट 2003 ते 13 मे 2007

थोडक्यात पण महत्वाचे










































































