Last Updated on 03 Mar 2022 11:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
माजी कृषी राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत यांनी माढा तालुक्यातील कुर्डुवाडी गावचे गावगाड्यातील शाहीर बापू जाधव यांना स्वतःची गाडी पाठवून त्यांना घरी आणून या लोक कलाकाराचा यथोचित सन्मान केला.सदाभाऊंनी केलेल्या या यथोचित सन्मानाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामीण लोककला जपणारा हा कलाकार व त्यांचे कुटुंबीय चांगलेच भारावून गेले.
फर्ड्या भाषणानं सभा गाजवणारे,गावाकडच्या भाषेत थेट बांधावरचे प्रश्न मांडणारे,शेतकऱ्याच्या काळजाला हात घालणारे,सरकारच्या शेतीविरोधी धोरणांवर घणाघाती टीका करणारे सदाभाऊ खोत यांचे वेगळेपण नेहमीच दिसून येते.कोल्हापूरच्या उसापासून नाशिकच्या कांद्यापर्यंत.कधी हमीभावाच्या मागणीसाठी,तर कधी निर्यातीवरच्या बंधनांविरोधात.कधी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे,तर कधी तहसील कार्यालयासमोर निदर्शने. मराठवाड्यातल्या दुष्काळाची चाहूल लागताच पहिली दुष्काळ दिलासा यात्रा या माध्यमातून सदाभाऊंनी नेहमीच वेगळेपण जपले आहे.

सदाभाऊ हे गावगाड्यात काम करणाऱ्या कलाकारांची तर ते नेहमी अस्तेवाईकपणे चौकशी तसेच सातत्याने मदतही करत असतात.माढा तालुक्यातील कुर्डुवाडी गावचे शाहीर बापू जाधव हे लोक कलाकार जोतिबाच्या डोंगरावर आल्याचे समजताच सदाभाऊंनी स्वतःची गाडी पाठवून त्यांना माझ्या घरी आणले.व त्यांचा यथोचित सत्कार केला
त्याचे असे झाले,गावगाड्यामध्ये अनेक कलाकार आपली पारंपरिक कला सादर करून आपला व आपल्या कुटुंबाच्या पोटाचा उदरनिर्वाह करत आहेत.माढा तालुक्यातील कुर्डुवाडी गावचे शाहीर बापू जाधव हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामीण लोककला जपण्याचे मोठे काम करत आहेत.
एकदा मुंबईवरून येत असताना त्यांची व सदाभाऊंची भेट झाली होती.सदाभाऊंनी अलीकडे सोशल मीडियावर त्यांची काही ग्रामीण गीते ऐकली.आणि शाहिरांना भेटण्याचा त्यांनी निश्चय केला.मित्रांच्याकडून शाहिरांचा फोन नंबर घेतला व त्यांना कॉल केला.कॉल केल्यावर ते जोतिबाच्या डोंगरावर ग्रामपंचायतच्या आवारामध्ये लेकराबळांसह मुक्कामाला होते.दुसऱ्या दिवशी सकाळी सदाभाऊंनी गाडी पाठवून त्यांना त्यांच्या इस्लामपूर येथील घरी आणले.यथोचित सत्कार केला व सर्वानी एकत्र स्नेहभोजन केले

शाहीर बापू जाधव यांनी एस.के.इंटरनॅशनल स्कुल,रेठरेधरण येथे सर्व विद्यार्थ्यांसमोर आपली ग्रामीण कला सादर केली.सायंकाळी सदाभाऊंनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या गाडीतून मिरज रेल्वे स्टेशन वरून सोलापूर गाडीत बसवले.गावगाड्यातील संस्कृती व कला जपण्याचे काम करणाऱ्या कलाकाराचा सदाभाऊंनी केलेल्या यथोचित सन्मानाने हा कलाकार व त्यांचे कुटुंबीय चांगलेच भारावून गेले.









































































