Last Updated on 19 Mar 2022 7:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विरोधकांचा सत्ता बदलायचा चंग : सत्ताधाऱ्यांचे मात्र सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न
राज्यात ग्रामीण भागात लोकांमध्ये लागल्या पैजा
पुणे ।
राज्यात सर्वत्र सत्ताबदलाची चर्चा सुरु आहे.आणि हे खरेही आहे.यावेळी नक्कीच सत्ताबदल होणार अशी चर्चा ग्रामीण भागात चौका-चौकात सुरु आहे.त्यावर लोकांमध्ये पैजाही लागत आहेत.गेल्यावेळी जमले नाही,पण यावेळी नक्की जमेल असा आशावाद अनेकजण बाळगून आहेत.
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे.दररोज नव-नवीन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.विरोधक-सत्ताधारी एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत.अधून-मधून नव-नवीन मुहूर्त निघत आहेत.दररोजच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे जनता वैतागली आहे.अधिवेशनात विकासकामांवर चर्चा कमी आणि घोटाळ्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.पण,राज्यातला सत्ताबदल होईल न होईल पण ग्रामीण भागात मात्र वेगळ्याच सत्ताबदलांची चर्चा सुरु आहे.
कोरोनामुळे राज्य शासनाने राज्यातील सुमारे ८ हजार सेवा सोसायट्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोरोनामुळे लांबलेल्या विकास सोसायटींच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे.त्यामुळे ग्रामीण भागात वातावरण चांगलेच तापले आहे.राज्यात काही सोसायट्यांच्या निवडणूक पार पडल्या.काहींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.अजूनही बऱ्याच संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना राज्यातल्या नव्हेतर त्यांच्या गावातल्या सोसायटीच्या सत्ताबदलाची काळजी लागली आहे.
लवकरच होऊ घातलेल्या आणि निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या सोसायट्यांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत आणि होत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाचा आर्थिक कणा असलेल्या या विकास संस्थांवर वर्चस्व राखण्यासाठी गावगुंडी राजकारण सुरु आहे. मागं जमलं नाही पण,यावेळेला सत्ताबदल करायचाच यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी यावेळी नक्की सत्ताबदल होणार अशी आशा स्थानिक विरोधक बाळगून आहेत.तशा हालचालीही ग्रामीण भागात सुरु आहेत.त्यासाठी गावगुंडी स्टाईलने पार्ट्या,कार्यकर्त्यांची जुळवा-जुळव ठीक-ठिकाणी सुरु आहे.राज्यातल्या सत्तेचे काय होईल ते होईल पण,आपली सत्ता बदलायचीच असा चंग स्थानिक विरोधकांनी बांधला आहे.सत्ताधाऱ्यांचे मात्र सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.












































































