Last Updated on 26 Sep 2023 7:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
‘संस्कारक्षम बोधामृत’ या पुस्तकाचे लेखक तुकाराम मारुती बाबर हे पदवीधर असून त्यांना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आहे.त्यांनी अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन,बोधरूपी कथांचे व ऐतिहासिक घटनांचे मनन व चिंतन केले आहे.यातूनच त्यांनी ‘संस्कारक्षम बोधामृत’ या पुस्तकरुपाने सर्व वाचकांना बोधरूपी प्रसाद देऊ केलेला आहे.छोट्या-छोट्या घटना व प्रसंगातून जीवन जगत असताना अशा बोधामृताचा उपयोग होईल असे वाटते.कारण सदरचे पुस्तक म्हणजे सद्वर्तनासाठी जीवन उपयोगी चिंतन होय.विविध विषयांवरील छोट्या-छोट्या कथांमधून लेखकाने बोधामृत देऊ केले आहे.आजच्या युगात माणूस अधिकाधिक स्वयंकेंद्री,आत्मकेंद्री होत चालला आहे. तसेच भौतिकवादी व चंगळवादी बनत चाललेला आहे.त्यामुळे नैतिक मूल्यांचा आणि संस्कृतीचा -हास होत असून समाजाचे अधःपतन असल्याचे दिसते.अशा या समाजाला या संस्कारक्षम बोधामृतातून मनाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.आध्यात्मिक,पौराणिक,सामाजिक,ऐतिहासिक व संत वाड्मयाच्या माध्यमातून या पुस्तकात कथांचे लेखन आणि संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, संत नामदेव व संत एकनाथ यांच्या संक्षिप्त चरित्रातून उद्बोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.शिवाय संतांचे थोडक्यात चरित्र सांगून लहान मुलांसाठी संताचा परिचय करून देण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे.त्यांच्या ‘संस्कारक्षम बोधामृत’ पुस्तकातील भाग आम्ही दर मंगळवारी प्रसिद्ध करत आहोत. ‘कर्माचा सिध्दांत’ पासून आम्ही सुरवात करत आहोत…
![]()
कर्माचा सिध्दांत
मनःशांतीसाठी एक तरूण साधू महाराजांकडे जातो. तीन चार महिने साधू जवळ राहूनही त्याला समाधान मिळत नाही.एके दिवशी तो नेहमीप्रमाणे मातीचा घडा घेवून नदीवर आंघोळीसाठी जातो.आंघोळ करून घडा भरून नदी पात्राच्या बाहेर येत असताना त्याच्या मनात विचार येतो की हा मातीचा घडा फोडून आपण आपल्या गावी जाऊ या,एवढ्यात तो घडा बोलू लागतो.
थांब मित्रा! मी सुध्दा पहिल्यांदा या नदीची माती होतो.लोक सकाळी सकाळी मला तुडवीत यायचे, विष्टा करायचे, पान तंबाखूच्या पिचकाऱ्या भारायचे, खूप-खूप वाईट वागणूक मला द्यायचे.पण एके दिवशी एका कुंभाराने मला पोत्यात भरून गाढवावरून त्याच्या घरी आणले. तिथे तर त्या कुंभाराने मला तुडवत तुडवत आणि पाणी टाकून माझा चेंदामेंदा केला, नंतर मला चाकात घातले. धोपटन धोपटन बेजार केले. मला घटाचा आकार दिला.चारपाच दिवस तळपत्या कडक उन्हात ठेवले. नंतर तर माझे हाल हाल केले. धगधगत्या भट्टीत बालन भाजून काढले.चटके सोसताना आईचे दूध आठवले रे. मित्रा! पण मी धोर सोडला नाही. भाजून झाल्यावर मला बाजारात विक्रोसाठी मांडले.प्रत्येकजण टिचकी वाजवून माझी किंमत करू लागला. अन् माझे भाग्य उजळले एका साधूने मला या आश्रमात आणले आणि गंगेच्या पाण्याच्या पूजनासाठी माझा उपयोग होऊ लागला. मी धीर सोडला नाही. माझ्या कर्माचे फळ मला मिळाले.
दुसरे असे की या जगात सगळयात महागडा बिछाना कुठला असेल तर तो फक्त आजारपणातील बिछानाच आहे. गाडी चालवायला भाड्याने ड्रायव्हर मिळेल,सेवेसाठी नोकरचाकर मिळतील,पण आपले आजारपण सहन करण्यासाठी आपण कोणालाही नेमू शकत नाही. आपणा स्वतःलाच त्या यातना सोसाव्या लागतात.तुमची बायको, मुली-मुले, सुना, नातवंडे तुमचीच आहेत.पण,आजारपणातील तुमचा त्रास ते वाटून घेवू शकत नाहीत.हरवलेल्या वस्तू सापडू शकतील पण आजारपणात गेलेले आयुष्य परत मिळवू शकणार नाही हे वास्तव आहे.गौतमबुध्दांना एकदा त्यांच्या शिष्यांनी विचारले की, आमच्यावर वाईट प्रसंग येईल त्यावेळी आमच्या बरोबर आई-वडिल, बायको,भाऊ,मुले येतील का? त्यावर भगवान बुध्द म्हणाले,’तुमचं पुण्यच तुमच्या वाईट वेळेला कामाला येईल.’इतर कोणीही येणार नाही.
धृतराष्ट्राने भगवान श्रीकृष्णांना विचारले,’मी राजा असूनही अंध का आहे?’ त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले,मागील जन्मात तुम्ही धनुर्धारी असताना उन्मतपणे अनेक पक्षांचे डोळे फोडले होते.त्या कर्माचे हे फळ आहे.धृतराष्ट्राचा मृत्यु अरण्यात झाला.अरण्यालाही आग लागली होती,चटके बसतील तसा तो झाडाला मिठी मारीत होता शेवटी भाजूनच त्यांचा मृत्यु झाला.
लेखक : तुकाराम मारुती बाबर
मु. पो. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली
सध्या राहणार : के. एन. पी. नगर,
रस्ता क्र. ६, इस्लामपूर,ता.वाळवा,जि.सांगली
मोबा. : ९४०५६११८४५![]()

‘संस्कारक्षम बोधामृत’ या पुस्तकाचे लेखक तुकाराम मारुती बाबर हे पदवीधर असून त्यांना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आहे.त्यांनी अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन,बोधरूपी कथांचे व ऐतिहासिक घटनांचे मनन व चिंतन केले आहे.यातूनच त्यांनी ‘संस्कारक्षम बोधामृत’ या पुस्तकरुपाने सर्व वाचकांना बोधरूपी प्रसाद देऊ केलेला आहे.छोट्या-छोट्या घटना व प्रसंगातून जीवन जगत असताना अशा बोधामृताचा उपयोग होईल असे वाटते.कारण सदरचे पुस्तक म्हणजे सद्वर्तनासाठी जीवन उपयोगी चिंतन होय.








































































