Last Updated on 03 Oct 2023 3:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
‘संस्कारक्षम बोधामृत’ या पुस्तकाचे लेखक तुकाराम मारुती बाबर हे पदवीधर असून त्यांना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आहे.त्यांनी अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन,बोधरूपी कथांचे व ऐतिहासिक घटनांचे मनन व चिंतन केले आहे.यातूनच त्यांनी ‘संस्कारक्षम बोधामृत’ या पुस्तकरुपाने सर्व वाचकांना बोधरूपी प्रसाद देऊ केलेला आहे.छोट्या-छोट्या घटना व प्रसंगातून जीवन जगत असताना अशा बोधामृताचा उपयोग होईल असे वाटते.कारण सदरचे पुस्तक म्हणजे सद्वर्तनासाठी जीवन उपयोगी चिंतन होय.विविध विषयांवरील छोट्या-छोट्या कथांमधून लेखकाने बोधामृत देऊ केले आहे.आजच्या युगात माणूस अधिकाधिक स्वयंकेंद्री,आत्मकेंद्री होत चालला आहे. तसेच भौतिकवादी व चंगळवादी बनत चाललेला आहे.त्यामुळे नैतिक मूल्यांचा आणि संस्कृतीचा -हास होत असून समाजाचे अधःपतन असल्याचे दिसते.अशा या समाजाला या संस्कारक्षम बोधामृतातून मनाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.आध्यात्मिक,पौराणिक,सामाजिक,ऐतिहासिक व संत वाड्मयाच्या माध्यमातून या पुस्तकात कथांचे लेखन आणि संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, संत नामदेव व संत एकनाथ यांच्या संक्षिप्त चरित्रातून उद्बोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.शिवाय संतांचे थोडक्यात चरित्र सांगून लहान मुलांसाठी संताचा परिचय करून देण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे.त्यांच्या ‘संस्कारक्षम बोधामृत’ पुस्तकातील भाग आम्ही दर मंगळवारी प्रसिद्ध करत आहोत. ‘कर्माचा सिध्दांत’ पासून आम्ही सुरवात करत आहोत…
![]()
अंगी नम्रता बाळगा
एकदा सासू आपल्या नवविवाहित सुनेला शेजारच्या म्हातारीकडे ताक आणायला पाठवून देते.म्हातारी ताक करीत असते.ती नववधू म्हातारीच्या घरात जाते.आजी ! आत्यांनी ताक आणायला सांगितलय’, म्हातारी काहीच बोलली नाही ताकाची रवी हलवण्यात ती गुंग असते.आजी! ताक पाहिजे’ दुसऱ्यांदा नववधू बोलली. परंतू प्रतिसाद मिळत नाही हे पाहून जरा मोठ्या आवाजात ती नववधू म्हणाली आजी! तुम्हाला ऐकायला कमी येतय का? कधी पासून मी ताक मागतेय, उठा! ताक द्या लवकर, मला उशीर होतोय. तेव्हा म्हातारी म्हणाली ‘जरा थांब पोरी ! लोणी काढून ताक देतो हं!’ मला थांबायला वेळ नाय! देणार का नाय ताक ? नसेल तर मी चालले बघा ! असे म्हणून ती नववधू फणकाऱ्याने त्या घरातून आपल्या घरात निघून येते व सासूला सांगते. आत्या ! तीन चार वेळा ताक द्या,ताक द्या असे म्हणाले पण त्या म्हातारीनं काय ऐकून न घेतल्यासारखच केलं.”तेव्हा सासू शांतपणे बोललो,असू दे, मी ताक आणते.
सासू घरातून बाहेर पडली.रस्त्यातच ताकवाल्या म्हातारीचा तीन-चार – वर्षांचा नातू खेळत होता.नाकातून शेंबडाची धार लागली होती.त्या सासूने त्या मुलाला उचलून कडेवर घेतले,आपल्याच पदराने त्याचा शेंबूड पुसला व त्याला दुकानात नेवून पाच रूपयाचा बिस्किटपुडा घेवून ताकवाल्या आजीकडे आली.नातवाला कडीवरून खाली उतरवले अन् म्हणाली आत्याबाई ! बाळाला कशाला रस्त्यावर सोडलया ! सर्दी झाली, नाकातून शेंबूड आलाय,मी पदरानं तीन-चार वेळा त्याच नाक पुसल बाई! दिष्ट व्हायची कुणाचीतरी बाळ्याला ! असे म्हणत १०-२० मिनिटे ताकवाल्या आजीशी गप्पा मारून नंतर उठून चालायला लागली. तेवढ्यात म्हातारी म्हणाली बरं झालं बाय! तू बाळ्याला घरात घेवून आलीस,थांब जरा,ताक घेवून जा,तेव्हा ती सासू म्हणाली नको! मी काय ताकाला भांडं आणलं न्हाय,तेव्हा म्हातारी म्हणाली नसू दे, मी देते घरातलं भांड! असे म्हणून म्हातारीनं स्वतःच्या भांड्यातून ताक दिले.
विनम्रतेने माणसे जोडावी लागतात तेव्हाच ती उपयोगी पडतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विनम्रवाणीने आयुष्यात जीवाभावाची माणसे जोडली म्हणून ते जाणता राजा झाले व लाखो हिंदूंच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले आहेत.
जी माणसे एक वर्षाचा विचार करतात ती शेतात बी लावतात,जी माणसे दहा वर्षांचा विचार करतात ती झाडे लावतात.व जी माणसे आयुष्याचा विचार करतात ती माणसे,माणसे जोडतात.म्हणून दुसऱ्याला मदत करायला शिका.
कुणाचेही मन दुखावले जाईल असे वागू किंवा बोलू नका…कारण-शब्द हे शस्त्र आहे.तलवारीने मान कापली जाते पण विखारी शब्दाने मन कापले जाते.
शब्द हसवतात । शब्द रडवतात ।।
शब्द रामायण घडवितात। शब्द महाभारत घडवितात ।। शब्द शब्द दुमदुमला तर नाद तयार होतो. । शब्दावर शब्द घासला तर वाद निर्माण होतो. ।। शब्दाने शब्द खुलला तर संवाद होतो. । शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो. ।।
म्हणून शब्द जपून वापरा आयुष्यभर सुखी राहाल.पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे! पैसा म्हणजे लक्ष्मी,ती चंचल असते.ती कायम आपल्यात रहावी असे वाटत असेल तर संयम बाळगा.
पैशाने आपण घर विकत घेवू शकतो,पण घराच गेलेले घरपण विकत घेवू शकत नाही.
पैशाने आपण घड्याळ विकत घेवू शकतो, पण गेलेली वेळ घेवू शकत नाही.
पैशाने आपण औषध घेवू शकतो, पण आपले आयुष्य वाढवून शकत नाही.
पैशाने एखादे पद, प्रतिष्ठा घेवू शकतो,पण मनातील आदर घेवू शकत नाही. प्रेम घेवू पैशाने आपण मऊ मखमली गादी विकत घेवू शकता, पण त्यावर शांत, निवांत झोप विकत घेवू शकत नाही.
पैशाने रक्त विकत घेवू शकतो,पण तुटलेली रक्ताची नाती विकत घेवू शकत नाही.
पैशाने आपण माणसे विकत घेवू शकतो,पण माणूसकी विकत घेवू शकत नाही.
ती माणूसकी तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे.म्हणूनच जिभेवर साखर असेल, वाणीत नम्रता असेल तर सर्व काही शक्य होते. म्हणून आयुष्यात माणसे जोडायला शिकले पाहिजे.
चंदनापेक्षा वंदन शीतल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी व्हा.
प्रभावा पेक्षा स्वभाव चांगला ठेवा.
लेखक : तुकाराम मारुती बाबर
मु. पो. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली
सध्या राहणार : के. एन. पी. नगर,
रस्ता क्र. ६, इस्लामपूर,ता.वाळवा,जि.सांगली
मोबा. : ९४०५६११८४५![]()
हेही वाचा – ‘संस्कारक्षम बोधामृत’ : कर्माचा सिध्दांत
![]()











































































