Last Updated on 10 Jul 2024 7:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बहे रामलिंग बेटावरून श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे प्रस्थान…
सांगली | प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषात आणि विठू नामाचा गजर करत आषाढी वारीसाठी बहे येथील रामलिंग बेटावरून श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.पायी दिंडी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.आषाढी वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच श्रीरामाच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीला जात आहेत.
रामलिंग बेटावर सोमवारी दुपारी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील आदींच्या हस्ते आरती झाली.तर पादुका पूजन सरपंच संतोष दमामे यांच्या हस्ते झाले.त्याआधी रविवारी प्रभू श्रीरामाच्या पादुका अभिषेक व प्राण प्रतिष्ठापना दिंडीचे चालक ह.भ.प. लखन कोकीळ यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी पौरोहित्य अधिक बडवे यांनी केले.यावेळी दिंडी सोहळ्याचे आयोजक सुधीर रोकडे,संजय विठ्ठल हुबाले,विकास भोसले,महादेव घोरपडे,भीमराव अरबुने,संजय जाधव,दिनकर पाटील,रसाळ,अरुण हुबाले,राजाराम नांगरे,पोपट हुबाले,बी.जी. मोहिते,यशवंत मोहिते यांच्यासह वारकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.बहे पुलावर पालखी व प्रभू श्रीरामाच्या पादुकांचे मोठयासंख्येने भाविकांनी दर्शन घेतले.

त्यानंतर पालखी प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषात आणि ‘ग्यानबा-तुकारामऽऽ’च्या नावाचा गजर करत बहेच्या दिशेने मार्गस्थ झाली.ही दिंडी सायंकाळी गावात दाखल झाली.बहे येथील मारुती मंदिर येथे आरती झाली.हुबालवाडी येथील विठ्ठल मंदिरात पालखीचे पूजन व आरती झाली.
ब्रह्मचैतन्य वैकुंठवाशी ह.भ.प. गुरुवर्य तात्यासाहेब वास्कर यांच्या कृपाशीर्वादाने या श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून प्रथमच दिंडी सोहळा निघाला असून आषाढी वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच श्रीरामाच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीला जात आहेत.मंगळवारी फार्णेवाडी श्री दत्त मंदिर दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
१० तारखेला आळसंद,११ तारखेला भांबुर्डे,१२ तारखेला घरनिकी,१३ तारखेला निंबवडे, १४ तारखेला चिकमहूद, १५ तारखेला सोनके,१६ तारखेला पंढरपूर येथे पोहोचणार आहे.१६ व १७ तारखेला पंढरपूर मुक्कामी असणार आहे.व १८ तारखेला संतपंगत घेऊन परतीचा प्रवास असा एकंदरीत सोहळ्याचा दिनक्रम असणार आहे.









































































