Last Updated on 06 Nov 2024 11:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाविकास आघाडीने मुंबईत प्रचाराचा नारळ फोडला आहे. महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांसाठी महालक्ष्मी योजना तसंच तरुणांसाठीही दरमहा पैसे देणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत केली आहे.
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पावर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांना मोफत बस प्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. लोकसेवेची पंचसुत्री म्हणत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन आज महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पंचसूत्रीत महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा समावेश आहे. महाविकास आघाडीने कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांना मोफत बस प्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. युवकांना महिन्याला प्रत्येकी ४ हजार रुपये जाहीर केले. तसेच कुटुंबाला २५ लाखांपर्यंत विमा जाहीर केला आहे. यासहित शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे.
यासोबतच शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. आणि नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या ५ गॅरंटी कोणत्या?
१. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज माफ
२. जातनिहाय जनगणना, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार
३. मुली-महिलांसाठी बससेवा मोफत
४. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिन्याला ४ हजार रुपये
५. महिलांसाठी महालक्ष्मी योजना, दर महिना ३ हजार रुपये









































































