Last Updated on 15 Mar 2024 9:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांची घोषणा
मुंबई । शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज मुंबईत केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प–‘जनसमर्थ’ चा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली
‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे.डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
किसान क्रेडीट कार्डच्या डिजिटायझेशनच्या या जनसमर्थ प्रकल्पासाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. बीड जिल्ह्यातील महसूल, कृषि अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसांत ४ लाख ७५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे फार्मर्स आयडी तयार केले आहेत. याकरिता दोन ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्रविरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. “ॲग्रीस्टॅक- सीपीएमयू” यांच्याकडून या प्रकल्पाचे कार्यान्वयन केले जात आहे.
या कार्यक्रमास कृषिमंत्री धनंजय मुंडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सर्वश्री बालाजी कल्याणकर, राजेश पवार, संजय रायमुलकर, कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, कृषि आय़ुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.











































































