Last Updated on 28 Nov 2025 8:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर । आपल्या शहराचे नांव इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले आहे. मात्र त्यामध्ये उरूणचा समावेश झालेला नाही. ज्यांनी उरूणचा समावेश न करण्याचे पाप केले, त्यांना शहर तील, विशेषतः उरूणातील जनता माफ करणार नाही,असा टोला माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी कोपरा सभेत बोलताना दिला. या शहरातील जनता डेंग्यू, मलेरिया,चिकनगुणिया आदी साथीच्या आजारांनी त्रस्त आहे. वाहतूक कोंडी हा रोजचीच डोकेदुखी बनली आहे. आम्ही आपणा सर्वांना विश्वासात घेऊन यातून निश्चित मार्ग काढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आ.पाटील यांनी काळा मारुती चौक, गणेश मंडई,बुरुड गल्ली,आंबेडकर नगर व उरूणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर कोपरा सभा घेतल्या.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे,माजी नगराध्यक्षा प्रा.सौ.अरुणादेवी पाटील,पै.भगवान पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील,प्रा.शामराव पाटील,मुनीर पटवेकर,माजी नगरसेवक एल.एन.शहा,खंडेराव जाधव,महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात,माजी अध्यक्षा रोझा किणीकर,संजय पाटील (धनी),संदीप माने,संध्या सचिन कांबळे,अँड.धैर्यशिल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,शैलेश पाटील,काँग्रेस पक्षाचे राजेंद्र शिंदे,शाकीर तांबोळी,अँड.आर.आर.पाटील, अँड.आकीब जमादार,बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे,शिवसेना (उबाठा) चे मानव गवंडी प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,मला ज्या-ज्या वेळी राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली, त्या-त्या वेळी या शहराच्या विकासाला भरीव निधी दिला आहे. राज्याच्या इतर शहरात जे चांगले आहे,ते आपल्या शहरात आणले आहे. आम्ही आमच्याकडे सत्ता असताना शहराच्या सर्वांगिण विकासाला मोठी चालना दिली होती. देशात सर्वप्रथम व्हायफाय व्यवस्था बसविली होती. या शहराला जोडणारे ताकारी रस्ता,वाघवाडी रस्ता,कामेरी रस्ता,बहे रस्ता काँक्रीटीकरण केले. मात्र सत्ताधाऱ्यांच्या ९ वर्षाच्या काळात नवे काय झाले? आमचा एक गडी तिकडे गेला हेच नवीन घडले. ते विरोधकांचा कारभार कसा चुकीचा आहे,असे जीव तोडून सांगत होते. आता त्यांना त्यांचे समर्थन करताना पाहून खंत वाटते.
माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील म्हणाल्या, आम्ही आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या अनेक योजनेत पुरस्कार मिळविले,या शहरास राज्यात कायम अग्रेसर ठेवले. विरोधकांनी काय केले?
शहाजी पाटील म्हणाले,माजी नगराध्यक्षां नी दलित प्रभागात आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मते घालण्याचे पाप केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जनता भाजपासह जातीयवादी पक्षांना मतदान करणार नाही.
एल.एन.शहा म्हणाले,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्याशिवाय कोणीही या शहराचा विकास करू शकत नाही. या शहरातील व्यापार-व्यवसाय वाढविण्याचा माझा प्रयत्न राहील.
पुष्पलता खरात म्हणाल्या,गेल्या निवडणुकीत मला थोड्या फरकाने यश मिळू शकले नाही. तरीही मी कायम कार्यरत राहिले. माझे कुटुंब व प्रभागातील जनतेने साथ दिली. मला यावेळी नगरसेवक म्हणून सेवा करण्या ची संधी द्यावी. यावेळी आनंदराव मलगुंडे,पै.भगवान पाटील,खंडेराव जाधव,शाकीर तांबोळी,अँड.आर.आर. पाटील,गणेश शेवाळे, शंकरराव चव्हाण, संदीप माने यांचीही भाषणे झाली. या सभांना राष्ट्रवादी व काँग्रेस,शिव सेना मित्र पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.












































































