Last Updated on 05 Nov 2024 7:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बारामती । राज्यसभेचा आपला दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी असून यानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार करावा लागेल, असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्य करत राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा – महायुतीस सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा : आ. जयंत पाटील
शरद पवारांनी बारामतीमध्ये आज युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी गेल्या ५५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सक्रिय असल्याचं नमूद करत त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले. “मी राज्यसभेत आहे, अजून माझं दीड वर्ष आहे, आता या दीड वर्षानंतर आता राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कसलीच निवडणूक लढणार नाही. आता किती निवडणुका लढणार? १४ निवडणुका केल्या. आणि तुम्ही असे लोक आहात की कधीच घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देताय. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. नवी पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय. याचा अर्थ समाजकारण सोडलेलं नाही. सत्ता नको. पण लोकांची सेवा आणि काम करत राहणार. असं शरद पवार म्हणाले.
साभार : प्रसार भारती











































































