Last Updated on 21 Mar 2025 9:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई | राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी 450 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. आणखी 1,500 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीसाठी येत्या 10 एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य प्रसाद लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी ही माहिती दिली या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री संजय खोडके, ॲड. अनिल परब, सुनील शिंदे, विक्रम काळे, श्रीमती चित्रा वाघ आदींनी सहभाग घेतला.
मंत्री आबिटकर म्हणाले की, प्रादेशिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागात नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. एमबीबीएस आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक वर्ष ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक असेल, असा निर्णय अंमलात आणला जाईल.
महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देताना मंत्री आबिटकर म्हणाले, औषध वितरणात येणाऱ्या अडचणी दूर करून वेळेवर औषधे उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचे आदेश दिले जातील. आरोग्य सुविधांची गुणवत्ता राखण्यासाठी औषधांची एनएबीएल नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणी अनिवार्य केली जाणार आहे. राज्यात वैद्यकीय वस्तू खरेदीसाठी स्थापलेल्या प्राधिकरणाबाबतही त्यांनी माहिती दिली. हा निर्णय औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी घेतला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. दर्जेदार औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी पुढील टप्प्यात कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका गोल्डन अवरमध्ये रुग्णांना अतिशय उपयुक्त ठरत आहेत. आता १८०० वाहने प्रस्तावित असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. अपघातप्रवण ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर वाढविणे तसेच तेथे रुग्णवाहिका ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. रुग्णालयांमधील उपहारगृहे चांगली करण्याबाबतही लवकरच धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Apr 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit Manifestation : आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरे असले,... Read more













































































