Last Updated on 10 Apr 2023 6:57 AM by Sanjay Patil/Adhorekhit
वीजेचा कडकडाट आणि बिबट्याची पोर्चमध्ये डरकाळी
सांगली । वार शनिवार…वेळ रात्री बाराची,वीजेचा कडकडाट,अवकाळी पावसाला सुरवात,त्यातच वीज गायब…आणि अशातच बिबट्याची डरकाळी ! यामुळे भीतीने लोक जागे.खिडकीतून डोकावल्यानंतर बंगल्याच्या पोर्चमध्ये बिबट्या अन् दोन बछडी ! घरातील लोकांनी मोठ्याने आवाज दिल्यानंतर बिबट्या व त्या दोन बछड्यांनी तेथून धूम ठोकली.ही घटना आहे वाळवा तालुक्यातील फार्णेवाडी (बोरगाव) गावातील.दरम्यान,बिबट्याचा वावर अगदी घरांपर्यंत पोहचल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

फार्णेवाडी येथील मुख्य चौकातील दत्त मंदिराजवळ असणाऱ्या हर्षल पोपट फार्णे यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये शनिवारी रात्री बिबट्या अन् दोन बछडी दिसली.शनिवारी रात्री १२ च्या सुमारास परिसरात वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरवात झाली.पावसामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.परिसरात मोठ्मोमोठ्याने कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता.त्यातच हर्षल फार्णे यांच्या बंगल्याजवळ बिबट्याने डरकाळी फोडल्याचा आवाज आला.बिबट्याच्या डरकाळीने घरातील लोकं जागी झाली.भुंकणारी कुत्री पळून गेली.घरातील लोकांनी खिडकीतून डोकावून बघितले तर पोर्चमध्ये बिबट्या व दोन बछडी दिसली.हर्षल फार्णे यांनी मोठ्याने आवाज दिल्यानंतर बिबट्या व दोन बछड्यांनी तेथून धूम ठोकली..पुढे बिबट्या व दोन बछडी बोरगाव रस्त्याने निघून गेली.लोकांना डांबरी रस्त्यावर बिबट्याच्या पायांचे ठसे दिसले आहेत.

बहे-खरातवाडी रस्त्यावर असणाऱ्या कुरणाच्या शेतात शनिवारी रात्री अवधूत विक्रम पाटील या युवकाला बिबट्या दिसला.संबंधित युवकाच्या दिशेने बिबट्याने येण्याचा प्रयत्न केला.पण,युवकाने प्रसंगावधान राखत जागेवर आपला ट्रॅक्टर वळवला.टॅक्टरच्या प्रकाशाने ‘त्या’ बिबट्याने उसाच्या फडात धूम ठोकली.त्याआधी,फार्णेवाडी येथे सायाळाचा पाठलाग करत बिबट्या बुधवारी सहाच्या सुमारास लोकवस्तीत शिरला होता.त्यानंतरही फार्णेवाडी परिसरात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला आहे.
दरम्यान,बहे,फार्णेवाडी परिसरात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे.बिबट्याचा मानवी वस्त्यांजवळ वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.







































































