Last Updated on 17 Nov 2024 3:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भाजपाने महाराष्ट्राचा बिहार केला आहे. देशात आपल्या राज्याच्या राजकारणाची खिल्ली उडविली जात आहे. साहेब आपल्या सर्वांच्या भरवशावर संपूर्ण राज्यात निर्धास्तपणे फिरत आहेत. त्यांनी गेल्या १०- १२ दिवसात राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ६०-७० सभा घेतल्या आहेत. जो पक्ष व चिन्ह आपण घरा-घरापर्यंत पोचविला,तोच पक्ष व चिन्ह घेऊन जनतेला फसविण्याचा उद्योग चालू आहे. मात्र आपली सुज्ञ व जागृत जनता त्यास फसणार नाही, असा विश्वास युवा नेते राजवर्धन पाटील यांनी इस्लामपूर येथील कोपरा सभांमध्ये बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ.जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ राजवर्धन पाटील यांच्या कोपरा सभा झाल्या.
यावेळी त्यांनी आ.जयंत पाटील यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मतदान करून साहेबांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
राजवर्धन पाटील म्हणाले, सध्या राज्यात महागाई,बेरोजगारी,शेती मालाचा भाव, महिलांच्यावरील वाढते अत्याचार,भ्रष्टाचार आदी प्रश्न मागे पडले असून जाती-धर्मात भांडणे लावली जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली का? मराठा व धनगर समाजाला आरक्षण दिले का? राज्याचा स्वाभिमान आणि गद्दार यांच्यातील ही लढाई आहे. महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीरनामा जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी महाविकास आघाडीस सत्तेवर बसवूया.
माजी नगराध्यक्ष ॲड.चिमण डांगे म्हणाले, विरोधक अफवा उठविण्यात माहीर आहेत. हा फुटला,तो फुटला अशा अफवा उठविल्या जातील. बळी पडू नका. आपल्या नेत्यास राज्याच्या सर्वोच्च पदाची संधी मिळणार आहे. गाफील राहू नका.इस्लामपूर शहरातून आ.जयंत पाटील यांना मोठे मताधिक्य देऊया.
दलित महासंघाचे शंकरराव महापुरे म्हणाले,काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात आपल्या मागासवर्गीय समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू होत्या. त्या या सरकारच्या काळात आपणास मिळाल्या का? जातीयवादी पक्षांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील, प्रा.अरुणादेवी पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, शिवसेनेचे शकील सय्यद, काँग्रेसचे ॲड.आर.आर.पाटील, माजी नगरसेविका ॲड. कोमल बनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्यावर हल्ला चढवित आ.जयंत पाटील यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
या कोपरा सभांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,आजी-माजी नगरसेवक,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































