Last Updated on 08 Sep 2024 8:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंत पाटील हे विकास पुरुष आहेत. त्यांनी वाळवा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देत राज्या च्या जडणघडणीत मोलाची योगदान केलेले आहे. त्यामुळे आम्हाला दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याची गरजच काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केला. विरोधकांची श्रेयवादाची टीका हास्यास्पद आणि राजकीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील समर्थक भाजपाचे वाळवा तालुकाध्यक्ष निवास पाटील,सरचिटणीस संदीप सावंत यांनी तुंग येथील श्री.हनुमान देवस्थान या ब वर्ग तीर्थस्थानास आम्ही ४ कोटी ९९ लाखाचा निधी आणला असून माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे या कामाचे श्रेय लाटत आहेत,अशी टीका केली होती. त्यास श्री.पाटील यांनी उत्तर दिले. खरेतर तुंग येथील श्री.हनुमान देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विरोधकांनी हा विषय राजकीय टीका-टिपण्णीचा करणे निषेधार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘राजारामबापू’ च्या सभासदांना ऑगस्ट पासून दरमहा ९ किलो साखर
श्री.पाटील म्हणाले, आ.जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातूनच तुंग येथील श्री.हनुमान देवस्थानाचा राज्य शासनाच्या तीर्थस्थान ब वर्गात समावेश झाला आहे. तुंग ग्रामपंचायत व देवस्थान समितीच्या मागणी वरून त्यांनी या तीर्थस्थानाच्या विकासाचा प्रस्ताव राज्याचे ग्रामविकास मंत्र्यांच्याकडे दिला होता. त्यामध्ये तीर्थस्थानास भक्त निवास,बहुउद्देशीय हॉल,तीर्थस्थानास जोडणाऱ्या रस्त्यांची सुधारणा,पालखीच्या प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा,स्वच्छतागृहे बांधणे आणि सांडपाण्याची व्यवस्था करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यांनी या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावाही केला आहे. त्यातून ४ कोटी ९९ लाखाच्या निधीचा आदेश झाला आहे. हा आदेश आ.जयंतराव पाटील यांनी देवस्थान समिती, तुंग सरपंच व सदस्यांकडे दिला असून गावाने आणि भाविकांनी या आदेशाचे स्वागत व अभिनंदन ही केलेले आहे.
श्री.पाटील म्हणाले, या मतदारसंघातील जनतेने गेल्या ३५-४० वर्षापासून आ. जयंतराव पाटील यांचे नेतृत्व तळहातावरील फोडाप्रमाणे जपले आहे आणि आ.जयंतराव पाटील यांनीही हा मतदारसंघ हेच आपले कुटुंब मानून हा मतदारसंघ राज्यात अग्रेसर ठेवण्याचे सातत्याने काम केले आहे. त्यांनी गेल्या ३५-४० वर्षात लोकांच्या उपयोगाची असंख्य विकास कामे केली आहेत. मग गेल्या ३५ वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटला,हे आपण कसे म्हणू शकता? या मतदारसंघा तील जनता जागृत आणि स्वाभिमानी आहे. ते मतदारसंघातील विकास पहात आहेत. त्याचे ऑडीट तुम्ही करण्याची गरज काय?









































































