Last Updated on 21 Sep 2022 6:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | स्टँडअप कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर ४२ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते…
गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा निर्माण झाली असून सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.
राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. तसेच काही दिवसांपूर्वी ब्रेन डॅमेज झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
राजू श्रीवास्तव यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव हे कवी होते. राजू लहानपणापासून मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियन व्हायचे होते. टीव्ही शो, कॉमेडी शो अवॉर्ड होस्ट करण्यापासून त्यांची सुरुवात झाली होती.
१९८८ मध्ये अभिनयाला केली सुरुवात, २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश
राजू श्रीवास्तव केवळ विनोदी कलाकारच नाही तर अभिनेते आणि राजकारणीदेखील होते. १९८८ मध्ये छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजू श्रीवास्तव सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमात दिसले होते. नंतर त्यांनी आणखी काही सिनेमे केले आणि नंतर कॉमेडीमध्ये प्रवेश केला. राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महामुकाबला यांसारख्या शोमधून ओळख मिळाली. ते ‘बिग बॉस ३’ आणि ‘नच बलिए’ सारख्या शोमध्येही दिसले होते.









































































