Last Updated on 02 Dec 2024 9:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बुधवारी सकाळी १० वाजता भाजपा आमदारांची बैठक
मुंबई । राज्यात सत्ता स्थापनेसाठीच्या घडामोडींनी वेग घेतला असून, महायुतीतील घटकपक्षांच्या अंतर्गत बैठका तसंच भेटीगाठी ही सुरु आहेत. भाजपा विधिमंडळ नेत्यांच्या निवडीसाठी येत्या ४ डिसेंबरला सकाळी १० वाजता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात भाजपा आमदारांची बैठक होणार आहे.
भाजपा विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीतून मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट होणार असल्यानं सर्वांचंच लक्ष्य या बैठकीकडे लागलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं याआधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची विधिमंडळ पक्षेनेते पदी निवड केली. दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या ५ तारखेला मुंबईत आझाद मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर, महायुती नेत्यांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नेते प्रविण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
गटनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टीच्या संसदीय समितीने महाराष्ट्रात पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राज्यात पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत.







































































