Last Updated on 16 Jul 2023 6:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्य विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (17 जुलै) सुरू होत आहे.हे अधिवेशन 4 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधक एकवटले असून राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे.17जुलै ते 4 ऑगस्ट या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस 15 आहेत. त्यात 4 दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे (शनिवार, रविवार) असणार आहेत.

दरम्यान,विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या वतीने आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री आणि विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

दरम्यान,अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधक एकवटले असून राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. बहिष्कार घालण्यामागचे कारणही विरोधी पक्षाने आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, “ठाकरे गट, शेकाप, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी बैठक घेऊन घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवले आहे. अर्थात आम्ही चहापानावर बहिष्कार घातलेला आहे.
गेल्या अधिवेशनात आक्रमक भूमिका मांडणारे सदस्य आता सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिलेच हे अधिवेशन होत आहे.
अजित दादांच्या बंडानंतरचे अधिवेशन
अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन होणार आहे.विरोधक कोणत्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार,सरकारकडून उत्तरे कशी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान,राष्ट्रवादीतील फूटीनंतर आता विधानसभेचा विरोधीपक्षनेता कोण हा प्रश्न कायम आहे.त्याचा निर्णय उद्या होणार असून कॉंग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना उद्या संधी मिळणार आहे.









































































