Last Updated on 03 Sep 2024 7:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आपणास मतदारसंघात अडकवून ठेवण्या साठी सत्ताधारी पक्षांच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न होतील. मात्र माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे,अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याची शपथ शहरातील पदाधिकारी,बुथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी घेतली.
इस्लामपूर येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बूथ अध्यक्षांना निवडपत्रे प्रदान समारंभ ते बोलत होते. यावेळी सर्वोत्कृष्ठ काम केलेल्या पाच बूथ अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. युवा नेते प्रतिक पाटील प्रसिध्द व्याख्याते यशवंत गोसावी,माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे,शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, प्रा.शामराव पाटील, अरुणाकाकी पाटील,तालुकाध्यक्ष विजय पाटील,खंडेराव जाधव,संदीप पाटील, पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृष्णेचे संचालक संजयकाका पाटील, व ‘राजारामबापू’चे संचालक शैलेश पाटील यांच्याकडून विधानसभेला विक्रमी मताधिक्य देणाऱ्या बुथना अनुक्रमे १ लाख व ५० हजाराचे बक्षिस जाहीर करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जनतेचे मोठे पाठबळ मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडी चे सरकार निश्चित येणार आहे. आपले सरकार आल्यानंतर शहरातील,तालुक्यातील उर्वरीत विकास कामांना गती देऊ. आपण आतापासूनच एकसंघपणे कामाला लागा. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. बदलापूर व मालवणच्या घटनेने राज्यातील जनतेमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. या सरकारला प्रायश्चित देण्याची जनतेची मानसिकता आहे.
यशवंत गोसावी म्हणाले, पक्ष व घरे फोडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री झालेले राज्याने पाहिले. आता जयंतराव साहेबांच्या रूपाने राज्याला निष्ठावंत मुख्यमंत्री द्यायचा आहे. ते राज्याची मुलूखगिरी करताना आपणास मतदारसंघ सांभाळावा लागेल. बुथ अध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सूक्ष्म नियोजन करून कामाला लागावे.यावेळी अँड.चिमणभाऊ डांगे,खंडेराव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पुष्पलता खरात यांनी आभार मानले. युवक सरचिटणीस अभिजित रासकर यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी विश्वनाथ डांगे,संजयकाका पाटील,ॲड. धैर्यशिल पाटील,सुभाषराव सूर्यवंशी,अरुण कांबळे,सुरेंद्र पाटील, दिग्विजय पाटील,अभिजित कुर्लेकर, शंकरराव चव्हाण,सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने,दिपाली साधू,शंकरराव पाटील, शैलेश पाटील,सचिन कोळी,स्वरूप मोरे, अभिमन्यू क्षिरसागर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































