Last Updated on 21 Oct 2024 11:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना आज (मंगळवारी। प्रसिद्ध होणार असून त्यासोबतच अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. या अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला होईल आणि ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही याच वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे.
राज्यात २८८ पैकी २५ मतदारसंघ अनुसूचित जाती आणि २९ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. मतदार यादीत आतापर्यंत ९ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांची नोंद झाली आहे. त्यात सुमारे ५ कोटी पुरुष आणि ४ कोटी ६६ लाखांहून अधिक महिला आहेत. सुमारे १ कोटी ८५ लाख हे २० ते २९ वयोगटातले मतदार आहेत. २० लाख ९३ हजारांहून अधिक मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदारयादीत नाव नोंदवलं आहे. कातकरी, कोलम, मारिया गोंड या विशेषतः आदिवासी जमातींमधल्या सर्व २ लाख ७७ हजार मतदारांची नोंद मतदार यादीत केल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
राज्यात विधानसभेसाठी एकूण १ लाख १८६ मतदार केंद्र असतील. त्यातले ४२ हजार ६०४ शहरी आणि ५७ हजार ५८२ ग्रामीण भागात आहेत. सर्वाधिक ८ हजार ४१७ मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी ९२१ मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.










































































