Last Updated on 15 Oct 2024 6:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभा निवडणुक होणार असून राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने झारखंडच्याही विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला होणार असून निकाल हा २३ नोव्हेंरला लागणार आहे. महाराष्ट्रात एकूण मतदार ९.६३ कोटी मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहेत. यात २०.९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र असणार असून शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत. तसेच निवडणुकीचे नोटीफीकेशन २२ ऑक्टोबरला निघणार असून उमेदवारांना २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील २८८ पैकी २३४ जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ व २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
मतदानाची अधिसूचना – २२ ऑक्टोंबर २०२४ (गुरुवार)
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – २९ ऑक्टोंबर २०२४ (गुरुवार)
उमेदारी अर्ज छाननी तारीख – ३० ऑक्टोंबर २०२४ ( शुक्रवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४ ( सोमवार)
मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४ ( बुधवारः)
मतमोजणीची तारीख – २३ नोव्हेंबर २०२४ (शनिवार)
मतदान प्रक्रिया समाप्ती – २५ नोव्हेंबर २०२४ (सोमवार)
गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार
ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, ते सांगावे लागणार आहे. तसेच राजकिय पक्षांनाही हा नियम लागू होणार आहे. त्यांना गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली ते सांगावे लागणार आहे.
विभागनिहाय जागा अशा
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा आहे.
मुंबई – ३६ जागा
कोकण-ठाणे – ३९ जागा
खान्देश – ४७ जागा
मराठवाडा – ४६ जागा
पश्चिम महाराष्ट्र – ५८ जागा
विदर्भ – ६२ जागा
शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षांचे संख्याबळ
भाजप – १०३ आमदार
शिवसेना (शिंदे पक्ष) – ४० आमदार
शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष) – १५ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) – ४३ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) – १० आमदार
काँग्रेस – ४३ आमदार
इतर – ३४ आमदार

झारखंड विधानसभा निवडणूक २०२४
निवडणूक अधिसूचना १८ आणि २२ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस २५ आणि २९ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्जांची छाननी २८ आणि ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२४
मतदान १३ आणि २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४
निवडणूक प्रक्रिया संपणार २५ नोव्हेंबर २०२४








































































