Last Updated on 17 Jan 2025 6:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कोणतेही वाहन चालवताना काळजीपूर्वक आणि वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण निश्चित घटेल असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी व्यक्त केला. वाहनांचे वाढती गर्दी आणि अपघातांचे प्रमाण विचारात घेता चालकांमधील सजगता वाढावी, अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सांगली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी 2025 या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सवारी मोटार ड्रायव्हिंग स्कूल इस्लामपूर यांनी केले. त्यावेळी API राजेश माने बोलत होते.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुनील मुळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सौ. अश्विनी चव्हाण तसेच महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वाहतूक निरीक्षक सुनील मुळे यांनी वाहतुकीचे नियम, अपघातापासून संरक्षण, अपघात झाल्यानंतर केली जाणारी मदत या संदर्भात सविस्तर माहिती दिली. सौ. अश्विनी चव्हाण यांनी अपघात कसे होतात, रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे, अपघात टाळण्यासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात; यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक राजेश माने यांनी दहा उपाय असे सांगितले की ज्यामुळे अपघाताचे प्रमाण अत्यल्प होईल आणि सुरक्षित वाहन कसे चालवावे यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केले.या प्रसंगी सवारी मोटार ड्रायव्हिंग स्कूल इस्लामपूर चे शरीफ पठाण यांच्यावतीने शिकाऊ वाहन परवान्याचे विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. गोरखनाथ किर्दत, प्रा. क्रांती कांबळे व सवारी मोटार ड्रायव्हिंग स्कूल इस्लामपूरचे शरीफ पठाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश स्वामी यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.अमोल चांदेकर यांनी मानले.











































































