Last Updated on 31 Aug 2023 8:02 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
मागील प्रश्नात वास्तु म्हणजे काय ?
वास्तुआकार,भूमीप्लव,भूमीवाढ -कट,भूमीपरीक्षण,भूमीशुद्धी,भूमी अधिग्रहण,आय व्यय,वास्तु मुहूर्त,गृहारंभ दिशा,शंकु स्थापना इ.शिलाण्यास,शुल आणि वेध यासंदर्भात सविस्तर माहिती मिळाली.मला आता असा प्रश्न विचारायचा आहे की,
प्रश्न क्रमांक १५
वास्तुशास्त्रानुसार कंपाऊंडच्या आत कोणती झाडे असावीत? कोणती नसावीत?
उत्तर –
फारच छान प्रश्न आहे . आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षवेलींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नास्ति मूलम् अनौषधम्। हे आयुर्वेदाचे महावाक्य | जिच्यामध्ये औषधी गुण नाहीत अशी एकही वनस्पती नाही .
आयुर्वेदानुसार औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि अवकहडा चक्रानुसार नक्षत्र राशी यांचे आराध्यवृक्षाशी संवाहक असलेलं मानवाशी नातं,यावरून वृक्षाला किती महत्त्व आहे हे समजते.
आपल्या वास्तुमध्ये कोणती झाडे असावी व कोणती नसावीत यासाठी अतिशय सुंदर असं विवेचन,
वृक्षायुर्वेद’या सहाव्या शतकात सुरपालने लिहिलेल्या ग्रंथात आढळते.तसेच अग्निपुराण,मत्स्यपुराण, गर्गसंहिता इत्यादी ग्रंथातूनही विपुल लेखन या संदर्भात आढळते. त्याच बरोबर वास्तु प्रदीप,मनुष्यलय चंद्रिका इ. ग्रंथात वृक्ष परिसर व दिशांचा संबंध याचा विस्तृत विचार आलेला आहे.
वृक्षायुर्वेद कार म्हणतात,
भवनस्य वट:पूर्वे दिग्भागे सर्व कामिक:।
उदुम्बस्तथायामे वारण्या पिप्पल: शुभ:॥

माझ्या वास्तुतील पूर्व दिशेत असणारा वड
भवनाचे उत्तरेला प्लक्ष(पिंपरी, पायर पाक्री,पिपर)पूर्वेला वट,(वड,बर,न्यग्रोध),दक्षिणेला औदुंबर(गुलर,उदुंबर) आणि पश्चिमेला अश्वत्थ(पिंपळ,पीपल यांची स्थापना उत्तम फळ देणारी ठरते.
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता इतकी मोठी झाडे आपण अंगणात जागे अभावी कशी लावू शकेन असा आपला प्रश्न असेल पण ही झाडे आपण कुंडीतही लावू शकता.मी माझ्या स्वत:च्या वास्तूमध्ये,ही झाडे कुंडीत लावून स्वत: उत्तम असा अनुभव घेत आहे.

दक्षिण दिशेत ठेवलेले उंबर
कोणती झाडे असावीत हे वरती सांगितले आहे.पण कोणती नसावेत हे निक्षून सांगताना वृक्षायुर्वेदकार म्हणतात.
आसन्ना:कंटकितो रियुत यदा किरणोऽर्थ नाशायऽ।
फलिन: प्रज्ञाक्षय दादारू एपविवर्जनं चेष्टं।
काटेरी अर्कासारखी दूध असलेली आणि आंब्यासारखी फळ असलेली झाडे अनुक्रमे शत्रूभय, संपत्ती हानी आणि अपत्य हानी करणारी असल्यामुळे ती घराचे सानिध्यात नसलेली बरी.तसेच या झाडांचे लाकूड सुद्धा बांधकामासाठी वापरू नये.त्याचबरोबर प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये, त्यामुळे द्वारवेध हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हे आवर्जून सांगितले आहे.अर्थात सोने देणारे झाड असली तरी घराच्या प्रवेशद्वारासमोर असू नये.तसेच घराचे दक्षिणेस नैऋत्येस आणि ईशान्येस फुलबाग निषिद्ध समजावी.या उलट पश्चिम, उत्तर पूर्वेस प्रशस्त समजावी.

पश्चिम दिशेतील पिंपळ
समरांगणसूत्रधार या ग्रंथात म्हटले आहे,
बदरी कदली चेैव दाडीमी बीजपू रिका।
प्ररोहन्ति गृहे यत्र तद् न प्ररोहति॥
बोरी ,केळी, डाळिंब, लिंबू ज्या घरात उगवतात त्या घराची भरभराट कधी होत नाही.
मत्स्य पुराण
या ग्रंथात
अवांच्छित ठिकाणी एखादा वृक्ष वाढलेला असल्यास आणि तो वृक्ष कापून काढून टाकणे इच्छा नसल्यास त्या वृक्षाच्या लगत अन्य शुभसूचक वृक्ष लावावेत.

महादेवास वाहिला जाणारा बेल
शुभसूचक वृक्ष-
अशोक ,नागकेशर, बकुळ, शमी, चंपक ,तिलक ,पुष्पी डाळिंब ,पिंपळी द्राक्ष फुलांचा मंडप जंबीर , सुपारी ,केतकी, मालती शतपत्रे ,कमळ ,चमेली ,नारळ ,केळी इ.
या वरून झाडे लावा झाडे जगवा याची अनुभूती आल्यावाचून राहत नाही.
मनुष्यलय चंद्रिका अध्याय १ श्लोक १२मध्ये म्हटले आहे.
पूर्वेला बकुळ, वड, फणस तसेच दक्षिणेला औदुंबर,चिंच ,सुपारी असल्यास समृद्धीदायक.पश्चिमेला पिंपळ आणि उत्तरेला नाग ,प्लक्ष,आंबा शुभदायक.

शुभ वृक्ष फणस
विपरीत ठिकाणी असल्यास विपरीत फळे मिळतात.पूर्वेला पिंपळ अग्निभय दक्षिणेला प्लक्ष प्रमाणात निष्काळजीपणा, पश्चिमेला वड शत्रू भय आणि शस्त्र भय,उत्तरेला उंबर उदरव्याधी.
‘वास्तुप्रदीप ‘ या ग्रंथात म्हटले आहे,दूध असलेली झाडे,वट अश्वत्थ,तांबडी फुले असणारी झाडे,काटेरी झाडे शाल्मली ,वृक्ष ,प्लक्ष ,औदुंबर जातीची झाडे आग्नेय कोपऱ्यात नेहमी दृष्ट मृत्युतुल्य पिडा देणारे ठरतात.
या उलट पुन्नाग फळ देणारी झाडे, कडुनिंब, डाळिंब अशोक जातीची ,नागकेशर फुलांची झाडे ,जपाकुसुम, केशर ,जयंती चंदन, अपराजित, बिल्व,आम्र, दालचिनी ,नागर ,नारळ ही वृक्षसंपदा यत्र तत्र जिथे पाहिजे तिथे लावता येतातआणि ही सदैव शुभफळ देणारे आहेत.ईशान्येला आवळा ,नैऋत्येला चिंच, आग्नेयेला डाळिंब, वायव्येला बिल्व, वृक्ष आणि उत्तरेला प्लक्ष, पूर्वेला वट ,दक्षिणेला औदुंबर व पश्चिमेला आश्वत्थ ही शुभफळ देणारे आहेत.
वरील ग्रंथांचा अभ्यास करता वास्तू परिसरात कोणती झाडे असावी व नसावीत या संदर्भात फक्त केळी,डाळिंब,आंबा या वृक्षा या संदर्भात मतांतरे वगळता बाकींच्या बाबतीत एकवाक्यता दिसतेे यावरून शास्त्राची प्रगल्भता अनुभवास येते.
मनुष्यलय चंद्रिका वास्तु प्रदीप आणि मत्स्यपुराण या मध्ये आंबा डाळिंब केळी शुभ वृक्ष सांगितलं आहे तर समरांगण सूत्रधार आणि वृक्षायुर्वेद या ग्रंथात आंबा, डाळिंब केळी अशुभ सांगितले आहेत.
पण मानवाच्या व्यावहारिक उपयोगामध्ये येणार्या देवपूजा, खाणे, यामध्ये येणारे वृक्ष हे शुभच मानावे. जसे आंबा, डाळिंब यांचा विचार शुभ वृक्ष म्हणूनच करावा.
असे बर्याच काही जाणकार वास्तु अभ्यासकांचे मत आहे.
क्रमश:
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…मागील भाग
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
![]()













































































