Last Updated on 31 May 2023 7:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती : उभारतोय सौर उर्जा प्रकल्प
वाळवा पंचायत समिती करणार सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । इस्लामपूर येथील वाळवा पंचायत समितीच्या इमारतीवर 14 किलो वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे.यामुळे पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहेत.सौर उर्जा प्रकल्प उभारणारी वाळवा पंचायत समिती जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरणार आहे.
सध्या सर्वत्र सौर उर्जा प्रकल्प उभारणीला शासनाकडून प्राधान्य व प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वाळवा पंचायत समितीनेही हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या आराखड्याला महा उर्जानेही मंजूरी दिली आहे.यासाठी यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 7 लाख 84 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.येत्या महिन्याभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल असेही त्यांनी सांगितले.
14 किलो वँट क्षमतेच्या या सौर उर्जा प्रकल्पामूळे पंचायत समितीच्या सर्व कार्यालयांना लागणारी सर्व विज उपलब्ध होणार आहे.त्यामुळे पंचायत समितीच्या मासिक वीज बिलाचीही सुमारे 15 हजार रुपयांची बचत होणार आहे.या वाचलेल्या वीज बिलामुळे या प्रकल्पाचा खर्चही पाच-सहा वर्षात निघणार आहे.सौर उर्जा प्रकल्प उभारणारी वाळवा पंचायत समिती जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती आहे.याचा आदर्श इतर शासकीय कार्यालयांनीही घेणे गरजेचे आहे.पंचायत समितीने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची पाऊलवाट तयार केली आहे.ग्रामपंचायतींनी त्यावरून वाटचाल करणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतींनीही सौर उर्जा प्रकल्पावर भर देणे गरजेचे
दरम्यान,वीज बिलाच्या बोजाखाली ग्रामपंचायती दबल्या गेल्या आहेत.त्यासाठी आर्थिक तरतूद करताना नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.यातून काही प्रमाणात सुटका करून घेणे ग्रामपंचायतींना शक्य आहे.सौरऊर्जा प्रकल्प राबवले, तर वीज बिलाच्या कचाट्यातून कायमची सुटका होऊ शकते.त्यातून ग्रामपंचायतींना आर्थिक आधार मिळू शकतो;पण त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक मानसिकतेची गरज आहे.
ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून भरभक्कम निधी उपलब्ध झाला आहे; पण दैनंदिन कामकाजासाठी त्याचा वापर करण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे करातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून राहावे लागते. त्यातील बहुतांश रक्कम वीज बिलापोटी खर्ची पडत असल्याचे वास्तव आहे. पाणी योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न वेगळाच आहे; पण ग्रामपंचायत इमारतीसह अन्य ठिकाणचे वीज बिलही दरमहा दोन ते पाच हजारांच्या घरात जाते. ग्रामपंचायत इमारत, समाज मंदिर, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, गावचावडी अगदी काही ठिकाणी मंदिरांचे वीज बिलही ग्रामपंचायतीच भरत आहेत.
या वीज बिलातून कायमची सुटका करून घेण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प राबवणे ग्रामपंचायतींना शक्य आहे. पंधराव्या वित्त आयोगातून त्यासाठी निधीची तरतूद करता येते. साधारण दोन ते अडीच लाखांत तीन किलोवॅटपर्यंतचा प्रकल्प उभा राहू शकतो. यातून निर्माण होणाऱ्या विजेचा ग्रामपंचायत इमारतीसह अन्य ठिकाणी पुरवठा करता येऊ शकतो. त्यामुळे वीज बिलातून कायमची मुक्ती मिळेल. परिणामी, वीज बिलावर खर्ची पडणारा स्वनिधी शिल्लक राहणार आहे. त्याचा उपयोग गावातील अन्य कामांसाठी करता येणे शक्य आहे; पण त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी रस्ते, पाणी, गटर्स यापलीकडे जाऊन शाश्वत विकासाचा विचार करणे आवश्यक आहे.![]()
पंचायत समितीमध्ये उभारण्यात येणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पामुळे वीज बिलाची बचत होणार आहे.यासाठी ७ लाख ८४ हजार खर्च अपेक्षित असून हा निधी १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध झाला आहे.आता तालुक्यातील ग्रामपंचायती व जि.प. शाळांमधूनही सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आबासाहेब पवार
गटविकास अधिकारी, वाळवा पंचायत समिती












































































