Last Updated on 03 Jul 2023 10:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,तसेच सर्व संस्थांचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार आणि आमचे नेते,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा निर्धार इस्लामपूर येथील बैठकीत व्यक्त करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश जनरल सेक्रेटरी दिलीप पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव विलासराव शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,माजी अध्यक्ष बी.के.पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील,माजी सभापती रविंद्रकाका बर्डे,राज्य सरचिटणीस अरुण कांबळे,राज्य चिटणीस भिमराव पाटील,माजी नगरसेवक विश्वनाथ अण्णासो डांगे,खंडेराव जाधव,माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्षा रोझा किणीकर,बाजार समितीचे सभापती संदीप पाटील,राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील,युवा नेते संदीप विजयभाऊ पाटील,युवती जिल्हाध्यक्षा पूजा लाड,युवक तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख,इस्लामपूर शहराध्यक्ष सचिन कोळी, आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले प्रामुख्याने उपस्थित होते.
दिलीप पाटील म्हणाले,भाजपने हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेना फोडली आणि आता दिल्लीत नियोजन करून राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांना केंद्रात पुन्हा सरकार आणायचे असल्याने त्यांनी हे दोन्ही पक्ष फोडले आहेत. मात्र पवारसाहेब या वयातही मैदानात उतरले असून त्यांना राज्या तून मोठा पाठींबा मिळत आहे. आपल्या तालुक्यास एक वैचारिक परंपरा आहे. आपण मोठ्या ताकदीने पवारसाहेब व आ.जयंतराव पाटील यांच्या पाठीशी उभा राहायचे आहे. जिल्ह्यातील चारही आमदार,जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हास्तरावरील सर्व संस्थांचे पदाधिकारी हे खा.पवारसाहेब व आ. जयंतराव पाटील नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याबरोबरच आहेत. पक्ष अडचणीत असताना जयंतराव पाटील हे स्वाभिमानाने,ताठपणे पक्षाच्या आणि नेत्याच्या पाठीशी उभा राहिले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री पद,विरोधी पक्षनेते पद मिळायला हवे होते. सध्या ते पक्षाचे राज्याचे नेतृत्व करीत आहेत,आपण सर्वांनी जबाबदारी घेत पक्ष वाढीचे काम करायला हवे.
वैभव विलासराव शिंदे म्हणाले,काल काही आमदारांनी पक्षात फूट पाडत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये शपथ घेतली आहे. या घटनेचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. आमच्यातील कोणीही त्यांच्या पाठीशी गेलेला नाही,त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन करतो. आम्ही पवारसाहेब व आ.जयंतराव पाटीलसाहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत.
विजयराव पाटील म्हणाले,खा.पवारसाहेब संपूर्ण देशातील विरोधकांची मजबूत मोट बांधत असताना भाजपाने कुटील डाव खेळत राष्ट्रवादीत फूट पाडली आहे. आज गुरू पौर्णिमेच्या दिवशी पवारसाहेबांनी कराड येथे स्व.चव्हाणसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. आम्ही सर्वजण या लढाईत पवारसाहेब व आमचे नेते आ.जयंतराव पाटील यांच्या पाठीशी उभा रहाणार आहोत.
प्रारंभी शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली.युवकचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी आभार मानले.यावेळी विराज शिंदे,माणिक शेळके,प्रदेश सदस्या कमल पाटील,प्रियांका साळुंखे,प्रा.डॉ.योजना शिंदे-पाटील,धैर्यशील शिंदे,बाबा सिध्द यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







































































