Last Updated on 02 Oct 2022 9:42 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । वाळवा तालुक्यातील तिघां युवकांनी रक्तदान चळवळीत योगदान देत आदर्श निर्माण केला आहे. इस्लामपूर येथील तरुण वकील जगदीश जाधव-पाटील यांनी 25 वेळा,शिरटे येथील निवास पवार यांनी 54 वेळा तर विनोद मोहिते यांनी 85 वेळा रक्तदान केले आहे.रक्त हे मानवी शरीरातच उपलब्ध होऊ शकते. यामुळे सध्याच्या घडीला वेगवेगळ्या आजारांमध्ये रक्ताची तातडीची गरज आहे. यामुळे रक्तदान ही काळाची गरज बनली आहे.

रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते.अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.रक्तदान चळवळीसाठी नेहमी पुढाकार घेणारे जगदीश जाधव-पाटील हे इस्लामपूर न्यायालयात वकिली करतात.2007 पासून ते रक्तदान करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 25 वेळा रक्तदान केले आहे.
शिरटे येथील निवास पवार हे वयाच्या 19 व्या वर्षांपासून रक्तदान करीत आहेत. बुर्ली ता.पलूस येथील एका भाजलेल्या महिलेला मिरज येथील काॅटेज हाॅस्पीटलला रक्ताची गरज होती. त्यांना रक्तदाते सापडत नव्हते. शेवटी पै-पाहुणे यांचे संबंधातून त्यांचा संपर्क झाला. त्यांना विचारल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी होकार दिला. त्यावेळीपासून आजपर्यंत रक्तदान करीत आहे. आत्तापर्यंत 54 वेळा रक्तदान केले आहे. रक्तदानाबरोबरच देहदान करण्याचा त्यांचा मानस आहे.
इस्लामपुरातील विनोद मोहिते यांनी आज अखेर 85 वेळा रक्तदान केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात रक्तदान चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. नियमितपणे रक्तदान करत रक्तदानाचे शतक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विनोद मोहिते यांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच रक्तदान करायला सुरुवात केली.रक्तदान चळवळीतील योगदाना बाबत त्यांना केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवा मंत्रालयाचा नेहरू युवा पुरस्कार मिळाला आहे. शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने, विविध रक्तपेढीनी श्री.मोहिते यांचा गौरव केलेला आहे. वर्षातून चार वेळा रक्तदान करीत आपण समाजाचे ऋण फेडता आहोत अशी त्यांची भावना आहे. यांच्या निस्वार्थी दानामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे रक्तदान म्हणजेच जीवनदान ही उक्ती खरी ठरली आहे. कॉलेज जीवनात एनसीसीच्या माध्यमातून शिस्त आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली.आणि त्यातूनच वयाच्या त्यांनी रक्तदान करायला सुरुवात केली. वर्षाला चार वेळा रक्तदान करण्याची सवय जडली आहे. रक्तदानाची चळवळ रुजवण्यासाठी विनोद मोहिते नेहमीच प्रयत्नशील असतात.
वाळवा तालुक्यातील अनेक संस्था रक्तदानाबद्दल तरुणांमध्ये जागृती करत रक्तदान शिबीर घेत असतात. तेव्हा तरुणांच्या मनात रक्तदानाच्या बाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जगदीश पाटील, निवास पवार, विनोद मोहिते प्रयत्न करीत असतात.समाजातील गरजू रुग्णांना देण्यासाठी आपण रक्तदाना पेक्षा आणखी मोठे काय देऊ शकतो. हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा एखाद्या गरजू पेशंटना रक्तदान करून त्यांना जीवदान देणे महत्त्वाचे आणि समाधान देणारे काम आहे. रक्तदानाने जात-पात धर्म-पंथ हे भेद नाहीसे होतात. प्रत्येक तरुण- तरुणीने रक्त दानातून हे साध्य करायला हवे यासाठी हे तिघे तरुण प्रयत्नशील आहेत. त्यांना रक्तदाता गौरव, रक्तदाता भूषण, युवा सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
![]()
वाढदिवशी रक्तदानाने साजरा होतो
रूढी-परंपरा सोडून अनेक तरुण वाढदिवस साजरा करताना दिसतात. अनेकदा रस्त्यावर,बागेत, सार्वजनिक ठिकाणी केक कापलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसतात. आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा काहींचा प्रयत्न असतो. अनेक जण सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरे करतात.पण जगदीश पाटील, निवास पवार, विनोद मोहिते हे आई,पत्नी, मुलांचा व स्वतःचा वाढदिवस रक्तदानाने साजरा करत आहेत. विविध राष्ट्रीय सण,जयंती, पुण्यतिथीच्या औचित्य साधून रक्तदान करत आहेत.
![]()












































































