Last Updated on 07 Sep 2023 4:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘रोहयो’ कर्मचाऱ्यांना तीन महिने मानधन नाही
पुणे । राज्यातील रोजगार हमी योजनेत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना नुकतीच महिन्याला प्रत्येकी 8 हजारांची मानधन वाढ करण्यात आली आहे.’रोहयो’ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 6 महिन्यापूर्वी राज्यभर सुरु केलेले काम बंद आंदोलन केले होते.पण,या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून मासिक मानधन मिळालेले नाही.हे कंत्राटी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
रोजगार हमी योजनेत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेने 6 महिन्यापूर्वी (मार्च मध्ये) राज्यभर सुरु केलेले काम बंद आंदोलन केले होते.मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत शासनाकडून आश्वासित केल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना महिन्याला प्रत्येकी 8 हजार रुपये मानधन वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला.राज्यातील सुमारे 3 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला.सदरची मानधन वाढ दिनांक 01 जुलै 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली.
एकाबाजूला ‘रोहयो’ च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 8 हजार रुपये मानधनवाढ झाली.पण,दुसऱ्या बाजूला मात्र या कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या तीन महिन्यापासून रखडले आहे.सणासुदीच्या काळातच मानधन रखडले आहे.मानधन लवकरात लवकर मिळावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.












































































