Last Updated on 06 Feb 2023 6:48 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मानधन वाढीचे आश्वासन : ‘रोहयो’ चे कर्मचारी आजपासून काम सुरु करणार
सांगली ।
रोजगार हमी योजनेत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेने राज्यभर सुरु केलेले काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.मानधन वाढीचा प्रस्ताव पुढील 15 दिवसाचे आत मंजूर करण्याबाबत शासनाकडून आश्वासित केल्यामुळे हे आंदोलन तूर्तास तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती राज्य सह सचिव अमोल पवार व राज्य संघटक मच्छिंद्र पाटील यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मागील 10 ते 12 वर्षापासून मग्रारोहयोची कामे करत आहेत.असे असतांना सुध्दा मागील 3-4 वर्षापासुन कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही मानधन वाढ झालेली नाही.त्यामुळे राज्य सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेने काम बंद आंदोलन सुरु केले होते.
आंदोलनाचे अनुषंगाने राज्यातील रोहयो अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या प्रतिनिधींसोबत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत नुकतीच मंत्रालयात बैठक झाली.यावेळी आमदार विनोद अग्रवाल,संजय गायकवाड,संजय बनसोडे,महेंद्र दळवी,अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्यासह कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली.
या बैठकीत मानधन प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले.मानधन वाढीचा प्रस्ताव पुढील 15 दिवसाचे आत मंजूर करण्याबाबत शासनाकडून आश्वासित केल्यामुळे संघटनेच्या वतीने सुरु असले काम बंद आंदोलन येत्या सोमवारपासून तूर्तास तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य सह सचिव अमोल पवार व राज्य संघटक मच्छिंद्र पाटील,सांगली जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सहदेव वाघमोडे,तांत्रिक सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष कुमार माळी आणि क्लर्क कम डेटा एन्ट्री संघटनेचे अध्यक्ष विजय निकम,उपाध्यक्ष सविता रजपूत यांनी सांगितले.मात्र आश्वासित केल्याप्रमाणे विहित वेळेत मागण्या समाधानकारकपणे पूर्ण न झाल्यास तात्पुरते स्वरुपात स्थगित करण्यात आलेले काम बंद आंदोलन पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या आहेत मागण्या…
मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करुन कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे,पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे,योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी,ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यात याव्यात,मध्यप्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी.












































































