Last Updated on 23 May 2025 3:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे बारा फुटांचा असणार आहे. महाराष्ट्राचा आधुनिक शेती व वाढत्या यांत्रिकीकारणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागाने अतिशय क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाने घेतला आहे.
बांधावरून जाणारे सध्याचे पारंपरिक अरुंद शेतरस्ते आधुनिक कृषी अवजारांची ये – जा सुलभ व्हावी, तसेच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहचावा यासाठी ३ ते ४ मीटर, म्हणजे जवळपास १२ फूट करण्यात येणार आहेत. पारंपरिक शेत रस्ता बांधणीच्या १९६६ च्या निर्णयानंतर प्रथमच म्हणजे, सुमारे ६० वर्षांनी महाराष्ट्राच्या आधुनिक शेतीसाठी हा निर्णय झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी हिताची पायाभरणी होत असून, सर्वंकष सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय अस्तित्वात आला आहे,
विशेष म्हणजे, शेतरस्त्यांच्या जागांमध्ये अतिक्रमणासह भविष्यातील खरेदी विक्रीच्यावेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नयेत म्हणून या शेतरस्त्याची नोंद जमिनीच्या ७/१२ मध्ये होईल.
या निर्णयाने आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी अवजारे आता थेट शेतातून घेऊन जाता येणार आहेत. राज्याच्या शेतीच्या वाटांवरून मोठा वाद असून या निर्णयाने किमान रस्ता झाल्याने शेताच्या बांधापर्यंत जाण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, शासनाकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर शेतीतील वाद मिटवण्यासाठी या रस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर 90 दिवसात करण्याचे शासन आदेश जारी करण्यात आला आहे.












































































