Last Updated on 15 Feb 2025 8:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूरच्या मुक्तांगण प्ले स्कूलचा उपक्रमाने रिक्षा काका भारावले..!
सांगली : शाळेसाठी मुलांना सुखरूप ने-आण करणाऱ्या रिक्षा काकांचा गुलाबाची झाडे व मायेची ऊब देणारी शाल पांघरूण सत्कार करण्यात आला. निमित्त होते व्हॅलेंटाईन डे चे ..! अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा झाल्याने रिक्षा काकां भारावून गेले.
इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी खेळातून व अनुभवातून शिक्षण दिले जाते. लहान मुलांच्या सोबतीने शिक्षकांनी रिक्षा व व्हॅन काकांचा व्हॅलेंटाईन डे खर्या अर्थाने सार्थ ठरवला.
‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेम व्यक्त करण्याचा, प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देण्याचा दिवस.. याचे औचित्य साधून मुक्तांगणमध्ये चिमुकल्यांच्या उपस्थितीत व्हॅन, रिक्षा, स्कूल बस चालकांना गुलाबाची झाडे भेट देऊन गौरविले गेले. शहरातील शाळेतील वेगवेगळ्या मुलांना ने-आण करणारे संदीप डांगे , उबेद मोमीन , शहाजी पवार, प्रमोद खोत या स्कूल बस, व्हॅन व रिक्षा काकांचा सन्मान झाला.स्कूलच्या संचालिका वर्षाराणी मोहिते, क्रिडो शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी तुषार जाधव, विनोद मोहिते यांनी गुलाबाची झाडे भेट दिली.

चिमुकल्यांचे शाळेचे पहिले पाऊल पडले की शाळेत ने-आण करण्यासाठी रिक्षा काकांची भूमिका महत्त्वाची असते. रोजच्या प्रवासाने
काका आणि मुलांचे अनोखे नाते बनते. शाळेच्या वातावरणाबरोबरच रिक्षा काकांच्या बरोबर केल्या जाणाऱ्या गमती जमती मुलांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. हेच रिक्षा काकां दुर्लक्षित असतात. त्यांना आज मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे सन्मानित करून आम्ही सुखद धक्का दिला.
वर्षाराणी मोहिते
संचालिका, मुक्तांगण
लक्षात राहणारा व्हॅलेंटाईन डे..!
दहा वर्षांहून अधिक काळ मी विद्यार्थ्यांची वाहतूक करतोय. सुरक्षितपणे शाळेपर्यंत पोहोचवण्याची व आणण्याची जबाबदारी घेत आहे. शाळकरी मुलांचे आणि आमचे एक वेगळ्या प्रकारचे नाते तयार झाले आहे. आज या नात्यामुळेच मुक्तांगण तर्फे व्हॅलेंटाईन डे दिवशी झालेला सत्कार आयुष्यभर लक्षात राहील. प्रेमाचे प्रतीक असणारे गुलाबाचे झाडच आम्हाला मिळाले. या झाडाचे जतन करू. आजचा झालेला सन्मान दीर्घकाळ आयुष्यभर लक्षात राहील.
उबेद मोमीन
रिक्षा काका









































































