Last Updated on 08 Oct 2024 10:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने केले सन्मानित
नवी दिल्ली | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आज, 08 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या अंतर्गत विविध विभागांतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.राष्ट्रपतींनी 2022 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान केला.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या चित्रपटांमधून आपल्या समाजाच्या कलात्मक जाणिवेचे दर्शन घडते. आता जीवन बदलत आहे.कलांचे मापदंड देखील बदलत आहेत.नव्या आकांक्षा उदयाला येत आहेत. नवनवीन समस्या समोर उभ्या ठाकत आहेत. नव्या जाणीवा देखील निर्माण होत आहेत. या सर्व बदलांमध्ये, प्रेम, कनवाळूपणा आणि सेवाभावी वृत्तीची न बदलणारी मूल्ये अजूनही आपले वैयक्तिक आणि सामुहिक जीवन अर्थपूर्ण बनवत आहेत.आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये आपण ही सर्व मूल्ये पाहू शकतो.
भारतीय चित्रपटसृष्टी हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती उद्योग असून आपल्या देशात विविध भाषांतील चित्रपट तयार होत आहेत आणि ते देशाच्या प्रत्येक भागात निर्माण होत आहेत असे त्या म्हणाल्या. चित्रपट हा सर्वाधिक वैविध्यपूर्ण कला प्रकार आहे असे मत व्यक्त करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्व लोकांचे कौतुक केले.
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन केले. चित्रपट क्षेत्रातील सुमारे पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत मिथुनजींनी केवळ गंभीर पात्रे रंगवली नाहीत तर सामान्य जीवनाबद्दलच्या कथा सांगणाऱ्या अनेक भूमिका त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उर्जेने यशस्वीपणे साकार केल्या.
राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या की पारितोषिक विजेत्या चित्रपटांच्या भाषा तसेच पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरीही ते सर्वच चित्रपट भारताचे प्रतिबिंब सादर करतात. हे चित्रपट म्हणजे भारतीय समाजाला आलेल्या अनुभवांचा अनमोल खजिना आहेत. भारतीय परंपरा आणि त्यातील विविधता या चित्रपटांमध्ये सजीवतेने साकारलेली दिसते असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, चित्रपट आणि समाज माध्यमे ही समाजात बदल घडवून आणण्यासाठीची सर्वात ताकदवान माध्यमे आहेत. सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करण्याच्या बाबतीत इतर कोणत्याही माध्यमापेक्षा चित्रपटांचा पडणारा प्रभाव अधिक आहे. आज वितरीत झालेल्या 85 हून अधिक पुरस्कारांपैकी केवळ 15 पुरस्कार महिलांनी मिळवले आहेत याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत राष्ट्रपती म्हणाल्या की, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास घडवण्याच्या दिशेने चित्रपट उद्योग अधिक प्रयत्न करू शकतो.
आशयघन चित्रपटांना बहुतेकदा प्रेक्षक मिळत नाहीत याकडे राष्ट्रपतींनी निर्देश केला.आशयघन चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागरूक नागरिक, सामाजिक संस्था आणि सरकारने एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार
मिथुन चक्रवर्ती यांनी ‘सुरक्षा’, ‘मृगया’, ‘डिस्को डान्सर’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘मृगया’ (1976) या त्यांच्या पहिल्या चित्रपटानेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता. ‘डिस्को डान्सर’ (1982) या चित्रपटाने त्यांना अखंड भारतभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या लघुपटला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटाचे निर्देशक व दिग्दर्शक सोहेल वैद्य यांनी स्वीकारला. “मर्मर्स ऑफ द जंगल” हा एक लघुपट आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाच्या, विशेषतः जंगलांच्या आणि वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. हा लघुपट भारतीय जंगलांचे महत्त्व, त्यांच्यातील विविधता, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारा -हास यावर आधारित आहे. लघुपटाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
या लघुपटात भारतीय जंगलातील विविध वन्यजीव, वनस्पती, आणि त्यांच्याशी संबंधित समुदायांचे जीवन दर्शविण्यात आले आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या संरक्षणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, या माहितीपटाव्दारे संदेश देण्यात आला आहे.
आणखी एक मोहेंजोदारो यास सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार “आणखी एक मोहेंजोदारो” या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक राणे यानी स्वीकारला. “आणखी एक मोहेंजोदारो” हा एक माहितीपट आहे ज्याचे दिग्दर्शन अशोक राणे यांनी केले आहे. या चित्रपटात गिरणगावाची कथा मांडण्यात आली आहे – मुंबईतील कापडगिरण्यांच्या सभोवतालची एक समृद्ध संस्कृती, जी 1850 च्या सुमारास फुलली. ‘गिरण्यांचे निवासस्थान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गिरणगावाने औद्योगिक क्रांतीच्या काळात जन्म घेतला, आणि एक अनोखी एकता अनुभवली. हा समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध, सामाजिकदृष्ट्या लवचिक आणि राजकीयदृष्ट्या जागरूक होतो. अनेक राजकीय चळवळींमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण 1980 च्या दशकात गिरणगावाच्या विनाशाची सुरुवात झाली.
सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार ‘वारसा (लेगसी)’
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार “वारसा” (लेगसी) या माहितीपटाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन सुर्यवंशी यांनी स्वीकारला. या चित्रपटात शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील लोक जपतात असून याला शिवकालीन युद्ध कला या नावानेही ओळखले जाते. या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे चित्रण केले आहे.
सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार प्रदान
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वोत्तम बॉलिवुड दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना ‘ऊंचाई’ चित्रपटासाठी , केजीएफ 1: चॅप्टर २’ सर्वोत्तम कन्नड चित्रपट आणि सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफीचा पुरस्कार, ‘काबेरी अंतरधान’ सर्वोत्तम बंगाली चित्रपट, ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटासाठी बॉलिवुड संगीतकार प्रीतमला सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार, ‘फौजा’ साठी नऊशाद सदार खान यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार, ‘अपराजितो’ ला सर्वोत्तम निर्मिती रचनाचा पुरस्कार, ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेता, ‘थिरुचित्राम्बलम’साठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’साठी मानसी पारिख यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. “वाळवी” या चित्रपटला सर्वोत्तम मराठी चित्रपटचा पुरस्कार जाहिर झाला आहे.













































































