Last Updated on 10 Dec 2023 5:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी
मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई । मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.गोरगरीब–गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे.या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.
आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या 17 महिन्यात 19 हजारपेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण 156 कोटी 60 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील जुलै महिन्यात 178 रुग्णांना76 लाखांची मदत देण्यात आली.ऑगस्ट महिन्यात 244 रुग्णांना 1 कोटी 1 लाख,सप्टेंबर महिन्यात 319 रुग्णांना 1 कोटी 86 लाख,ऑक्टोबर महिन्यात 276 रुग्णांना 2 कोटी 35 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 1031 रुग्णांना 8 कोटी 52 लाख,जानेवारी 2023 मध्ये 1032 रुग्णांना 8 कोटी 90 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 1274 रुग्णांना 10 कोटी 59 लाख, मार्च 2023 मध्ये 1459 रुग्णांना 11 कोटी 93 लाख,एप्रिल मध्ये 1190 रुग्णांना 9 कोटी 91 लाख, मे मध्ये 1329 रुग्णांना 11 कोटी 25 लाख, तर जून मध्ये 1728 रुग्णांना 14 कोटी 62 लाख, जुलै 1488 रुग्णांना 12 कोटी 72 लाख,ऑगस्ट मध्ये 1567 रुग्णांना 13 कोटी 14 लाख, तर सप्टेंबर मध्ये विक्रमी 1408 रुग्णांना 11 कोटी 77 लक्ष रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी,कर्करोगावरील शस्त्रक्रिया,केमोथेरपी,डायलिसिस,जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया,रस्ते अपघात,विद्युत अपघात,भाजलेले रुग्ण,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.










































































