Last Updated on 27 Sep 2025 5:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
‘सचेत’च्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना देण्यात येत असून भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्थांसोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने स्थानिक पथके तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.








































































