Last Updated on 07 Nov 2024 7:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे उद्यापासून मतदार जागृती अभियान सुरू होत आहे. अभियानाची सुरुवात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथून उद्या होत आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोकलिंगम, उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, तृतीयपंथी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, दिव्यांग अधिकार कार्यकर्ते निलेश सिंगित व प्रथितयश कलावंतांच्या उपस्थितीत संध्याकाळी होत आहे.
२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे.राज्यातील प्रत्येक मतदार नागरिकांनी न चुकता मतदान करावे, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये प्रचार वाहनाद्वारे मतदारांना अवश्य मतदान करण्याविषयी प्रोत्साहित केले जाईल; तसेच मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची माहिती कुठून मिळवायची, आचारसंहिता नियम, आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसल्यास कुठे तक्रार करायची, अशी सर्व माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्रातील कलावंत, खेळाडू यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मतदारांना केलेले आवाहन एलइडी स्क्रिनच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. या पंधरा जिल्ह्यात तालुका स्तरावर, मतदानाची कमी टक्केवारी असलेल्या १३३ मतदार संघातून हे प्रचार वाहन प्रवास करेल. केंद्रीय संचार ब्युरोचे लोककलावंत देखील लोककलेच्या माध्यमातून मतदारांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम दिनांक ११ ते २० नोव्हेंबर दरम्यान सुरू राहील.











































































