Last Updated on 29 Apr 2023 10:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शाळांचा निकाल 1 मे रोजी नाहीतर आता ६ मे रोजी लागणार
पुणे । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांचा निकाल 1 मे रोजी नाहीतर आता ६ मे रोजी लागणार आहे.त्याच दिवशी विद्यार्थी/पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार तपशिलवार सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधीच निर्गमित करण्यात आल्या आहेत.यामध्ये सुट्टीचा कालावधी,शाळाचे निकाल जाहीर करणे,सन २०२३-२४ चे जागामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादीबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ६ मे २०२३ रोजी आहे.
महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यास्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक १ मे २०२३ रोजी ‘महाराष्ट्र दिन’ सालाबादप्रमाणे साजरा करण्यात यावा.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे तसेच, निकालासोबत उपक्रम/कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा,असे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
शाळांच्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.












































































