Last Updated on 12 May 2024 9:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.ठाणे, मुंबई, पालघर, रायगडमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पुढील तीन दिवस वीज आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील पुणे, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील तापमान उन्हामुळे चांगलेच वाढले आहे. सुर्योदय झाल्यानंतर पुढच्या काहीच तासात अगदी सकाळीही कोवळ्या उन्हाचा चटका वाढतो आहे. दुपारी तर सुर्य आग ओकताना दिसतो आहे.अशा स्थितीत उकाड्याने जीवाची घालमेल होणारे जीव आणि पाणी नसल्याने सुखलेली झाडे पाऊस कधी पडतो याचीच प्रतिक्षा करत असतात.अशा वेळी अवकाळी पाऊस राज्यातील अनेक ठिकाणी बरसतो आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील सर्व शहरांमधील तापमानांमध्ये घट होत असून 13 मे रोजी मुंबईमध्ये कमाल 33 तर किमान 27 अंश सेल्सिअस एवढे तापमान राहण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
दरम्यान,आयएमडीने 12 ते 18 मे हा चार दिवसांचा काळ काही शहरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या ठिकाणी ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.खास करुन पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर मध्य महाराष्ट्रात नाशिक,अहमदनगर तर मराठवाड्यामध्ये नांदेड आणि लातूर, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील नागपूर आणि आसपासच्या वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 4 ते 5 दिवस नागपूरवर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असला तरी उष्णता देखील वाढलेलीच राहणार असून 13 मे रोजी नागपूर मध्ये 40 अंश सेल्सिअस तेवढे कमाल तापमान राहू शकते.










































































