Last Updated on 29 Nov 2022 7:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु असल्याने गावागावामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून,यामध्ये निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे,नामनिर्देशन मागवून छाननी करणे,नामनिर्देशन मागे घेणे,मतदानाचा दिनांक,मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक नमूद केला आहे.सदर ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल दि.२० डिसेंबर रोजी आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सध्यपरिस्थिती ७ हजार १४७ इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील सुरु करण्यात आला आहे.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेल्या ७ हजार १४७ सहकारी संस्थांपैकी “अ” वर्ग, ३८ “ब” वर्ग १ हजार १७०, “क” वर्गातील ३ हजार १५१ व “ड” वर्गातील २ हजार ७८८ सहकारी संस्थांचा समावेश आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु असल्याने गावागावामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच, “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या ही मोठ्याप्रमाणात असून या वर्गातील सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेचशे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
राज्यात सद्य:स्थितीत ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा सुरू असलेला कार्यक्रम,त्याचप्रमाणे ७ हजार १४७ सहकारी संस्थांचा निवडणूकीचा कार्यक्रम हे एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात,वर्ग “क”, “ड” तसेच,वर्ग “इ” प्रकारच्या सहकारी संस्था,त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी मा. उच्च मा. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे,अशा सहकारी संस्था वगळून,राज्यातील “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील त्या टप्यावर दिनांक २० डिसेंबर, २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. ज्या वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी,असे सहकार विभागाच्या आदेशात म्हटले आहे.












































































