Last Updated on 05 Nov 2024 3:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर आज संजय वर्मा यांची नियुक्ती झाली. ते १९९० च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहेत. सध्या ते कायदा आणि तंत्रज्ञान विषयक पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
एप्रिल २०२८ मध्ये ते निवृत्त होणार आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं काल रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याचे आणि त्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विवेक फणसळकर यांच्याकडे या पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवला होता.
रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.










































































