Last Updated on 04 Feb 2024 7:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
साखराळे येथील सभेत आ.जयंत पाटील यांचा सवाल
सांगली । केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. दिवसेंदिवस देशावरील कर्ज वाढत आहे. महागाईने सामान्य माणूस बेजार झाला आहे. रुपयाची किंमत कमी- कमी होत आहे. राज्यकर्त्यांनी कुठे नेवून ठेवलाय देश आपला?असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी साखराळे येथील सभेत केला.
‘एक तास राष्ट्रवादीसाठी,महाराष्ट्राच्या विकासासाठी’या उपक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,माजी सभापती आनंदराव पाटील, सरपंच सुजाता डांगे,राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष अविनाश पाटील,उद्योजक सर्जेराव यादव,उपसरपंच बाबुराव पाटील,माजी पं.स.सदस्य शिवाजी डांगे,माजी चेअरमन भास्करराव पाटील,अलका माने,रामराजे पाटील,माजी उपसरपंच राजेंद्र पाटील,सचिन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
सामान्य माणसाला बेदखल करून गुंडांना प्रतिष्ठा दिले जाणारे चित्रपटातील दृश्य सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे,हे दुर्दैवी असल्याची भावना मांडून आ.पाटील म्हणाले, अमेरिका,युरोप आदी देशात मोठ्या गुंतवणूक केल्या जातात. मात्र इराण,इराक,अफगाणि स्तान पाकिस्तान आदी देशात मोठी गुंतवणूक येते का? भारत हा सहिष्णू देश असून आपल्या देशात सामाजिक शांततेची सुरक्षा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गेल्या ७५ वर्षात केवळ ५६ लाख कोटी कर्ज होते. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी केवळ १४ वर्षात ते २०५ लाख कोटी रुपयांवर नेऊन ठेवले आहे.
शिवाजी डांगे,भास्करराव पाटील,राजेंद्र पाटील,अमोल पाटील (माऊली),विजय जाधव यांनी राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणावर प्रहार केला.यावेळी अमोल पाटील यांच्या कन्येचा आ.पाटील यांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रारंभी अविनाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सुनिल पाटील यांनी आभार मानले. प्रा.अमोल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी,माजी सरपंच पी.बी.सुर्वे,वसंतराव माने,नारायण पाटील,मोहन लोहार,शशिकांत पाटील,विनोद बाबर,अर्जुन कचरे,तजमुल चौगुले,सतिश पाटील,मधुकर जाधव,सुशिल पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ ऐवजी संध्याकाळी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’उपक्रम
आ.जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविला जात आहे.ते गेल्या सर्व बैठकींना उपस्थित राहिले आहेत. मात्र आज त्यांना जेजुरी येथे कार्यक्रम असल्याने त्यांनी सकाळ ऐवजी संध्याकाळी साखराळे येथे ही बैठक घेतली.









































































