Last Updated on 04 Sep 2025 5:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष व तांबवे (ता. वाळवा) गावचे सुपुत्र नेताजीराव शहाजीराव पाटील (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने गुरूवारी निधन झाले. लोकनेते राजारामबापू पाटील व माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे ते निष्ठवंत होते.
राजारामबापू दूध संघाच्या संचालक मंडळावर सन १९९२ पासून कार्यरत असून एकूण ३३ वर्षाचे कारकिर्दीमध्ये १२ वर्षे संघाचे अध्यक्षपद भुषविले तर साडे चार वर्षे उपाध्यक्षपद भुषविले होते. तसेच त्यांनी कृष्णा साखर कारखान्याचे संचालक म्हणून ही काही वर्षे काम पाहीले होते.
नेताजीराव पाटील यांचे कारकिर्दीमध्ये संघाने दुध उत्पादकांचे हिताचे दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले व संघ नावारुपास आणण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. साधे, सरळ, मितभाषी आणि सर्वांना बरोबर घेवून काम करणेचा त्यांचा स्वभाव त्यांचा होता. आबांच्या निधनामुळे दूध संघाचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक. अधिकारी, कर्मचारी तसेच संघासी सलग्नित प्राथमिक सहकारी दूध संस्था सेंटर्स चे कर्मचारी व उत्पादक यांचेमध्ये दुःखाची छाया पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
एक विश्वासू सहकारी गमावला : आ. जयंत पाटील
तांबवे गावचे सुपुत्र, माझे ज्येष्ठ सहकारी, राजारामबापू पाटील सह दुधसंघाचे अध्यक्ष श्री. नेताजी शहाजीराव पाटील (आबा) यांच्या दुखःद निधनाची बातमी मनाला वेदना देणारी आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
नेताजी आबांचा स्वभाव हा मृदू व मनमिळाऊ होता. राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या प्रगतीत संचालक, अध्यक्ष पद भूषवून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. राजकीय व सामाजिक जीवनात देखील त्यांनी मला मोलाची साथ दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना एका दुर्धर आजाराने गाठले. त्या आजारावर मात करीत आबा पुन्हा सक्रिय होतील असा आम्हाला विश्वास होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आज एक विश्वासू सहकारी गमावला याच दुःख आहे.
आबांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
आ. जयंत पाटील











































































