Last Updated on 24 Jul 2025 8:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘व्ही.एस.आय’च्या ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीरासाठी १४ महिला रवाना
सांगली । आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील विविध गावांतील १४ महिला शेतकऱ्यांना पुणे येथील व्हीएसआय (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) संस्थेमध्ये ऊस शेतीविषयक अद्ययावत ‘ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. या शेतकरी रवाना झाल्या असून, त्यांना अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे.
या महिलांना कारखान्याच्या प्रांगणातून निरोप देण्यात आला. यावेळी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करताना सांगितले, अद्यावत ऊस शेतीचे प्रशिक्षण घेण्यास वाळवा तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत,हे पाहून समाधान वाटते. महिला शेतकऱ्यांनी व्हीएसआयमधील अद्यावत ज्ञान व माहिती घेऊन आपल्या शेतकरी पतीस ऊसाचे विक्रमी उत्पादन घेण्यास हातभार लावावा.
कार्यक्रमात ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील, संग्राम पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
इस्लामपूरच्या अर्चना जाधव,कमल दिलीप ठोंबरे,लवणमाचीच्या जयश्री भरत कदम,कि.म.गडच्या वनिता दत्तात्रय मोहिते, आष्टाच्या अलका शिवेंद्र पाटील,बागणीच्या परबीन फिरोज वठारे,कुरळपच्या वंदना राजेंद्र जाधव,भवानीनगरच्या आशालता धनाजी सावंत,कासेगावच्या सुजाता विनोद तोडकर,सुनंदा मोहन शिणगारे,वाळव्याच्या सुनिता सुधीर कोले,ताकारीच्या नयना रविंद्र पाटील,कारंदवाडीच्या शैलजा प्रमोद पाटील, माळवाडीच्या प्रमोदनी शितल व्हसुकले या महिला शेतकऱ्यांना चार दिवसाच्या अद्यावत प्रशिक्षणास पुण्यास पाठविण्यात आले.
कार्यक्रमास कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे, वाहन विभाग प्रमुख सुनिल जाधव, एचआर मॅनेजर अनिलकुमार पाटील, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील, पतसंस्थेचे उपाध्यक्ष किरण बाबर व इतर कर्मचारीही उपस्थित होते.
महिलांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद व प्रशिक्षणातून त्यांना मिळणारे ज्ञान भविष्यात ऊस शेतीत नवसंजीवनी देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







































































