Last Updated on 14 Aug 2025 6:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । पुण्यश्लोक,राजमाता अहिल्यादेवी होळकर या परम शिवोपासक होत्या. मात्र त्यांच्या धर्मनिष्ठा या व्यापक होत्या. त्यांनी कायम आपल्या धर्माबरोबर इतर धर्मांचाही आदर केला आहे,असे गौरवोद्गार माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी काढले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी २३० वर्षांपूर्वी पुरुषप्रधान व्यवस्थेत आपले नेतृत्व गुण सिध्द केले. त्या खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणा च्या प्रेरणास्रोत आहेत,असेही त्यांनी सांगितले
हेडिंग द्या
खरातवाडी (ता.वाळवा) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर २३० व्या पुण्यतिथिनिमित आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी धनगर महासंघाचे वाळवा तालुकाध्यक्ष,कृष्णेचे संचालक अविनाश खरात,राजारामबापू दूध संघाचे संचालक अनिल खरात,माजी सरपंच पै.तानाजी खरात,पृथ्वीराज खरात,सरपंच कांचन एटम,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी आ.जयंत पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आ.पाटील पुढे म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र त्या कधी डगमगल्या नाही. उलट त्या मोठ्या धैर्याने या संकटांना सामोरे गेल्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात दान केले,धर्मकार्य केले आणि लोक कल्याणकारी राज्य कारभार करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी दानशूर, न्यायप्रिय शासक आणि पराक्रमी योद्धा म्हणून इतिहासात आपल्या एक ठसा उमटविला आहे.
प्रारंभी धनगर महासंघाचे वाळवा तालुकाध्यक्ष,कृष्णेचे संचालक अविनाश खरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर राजारामबापू दूध संघाचे संचालक अनिल खरात यांनी आभार मानले. याप्रसंगी विकास खरात,नारायण खरात,राहुल खरात,ज्ञानदेव खरात,शिल्पा खरात,जयमाला खरात,कल्पना खरात,वंदना सलगर,शशिकांत दगडे,संतोष मदने,उदय मदने यांच्या सह प्रमुख कार्यकर्ते व स्त्री-पुरुष ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.












































































