Last Updated on 16 Aug 2024 7:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजना : महिलांच्या बोलक्या प्रतिक्रिया, बहिणींच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा
छत्रपती संभाजीनगर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याप्रमाणे माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. रक्षाबंधनाआधीच आमच्या या लाडक्या भावाकडून ओवाळणी मिळाली, खूप आनंद झाला!, हे उद्गार आहेत जिल्ह्यातील बहिणींचे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण ५ लाख ४१ हजार ७१६ अर्ज आले होते. त्यापैकी ५ लाख ३३ हजार ७८३ लाभार्थी पात्र ठरल्या आहेत. या पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये काल पासूनच जमा होत होते. पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईल वर पाहुन महिलांच्या आनंदाला पारावार रहात नव्हता.महिलांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया फार बोलक्या होत्या.
आपल्या हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आपल्या भावाने पाठवलेली ही रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून हा पैसा निव्वळ योजनेचा लाभ न राहता त्याला एक वेगळे भावनिक परिमाण लाभले आहे,असे या बहिणींच्या मनोगतातून स्पष्ट होते. कुणाला आपल्या संसाराला हातभार लाभल्याचे अप्रुप होते तर कुणाला आपल्या हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद होता. भावाने दिलेला शब्द पाळला अशीही भावना व्यक्त केली. एकंदर महिलांच्या जीवनात या योजनेमुळे बदल होऊन त्यांच्यात आत्मविश्वास बळावलेला दिसला.
श्रावण महिन्यातील व्रत, उत्सव आणि रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहीणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाल्याने अनेक बहीणींना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. काही बहीणीनी आपल्या मोबाईलवर आलेले संदेश आपल्या मुलांकडून, पतींकडून पडताळून घेतले.
आधार लिंक करण्यासाठी महिलांचा बँकाकडे ओढा
स्वातंत्र्यदिनापासून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.ज्या महिलांच्या बँक खात्याशी त्यांचे आधार संलग्न झालेले नाहीत अशा महिलांची बँकांकडे गर्दी दिसून येत आहे.बँक यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या असून सर्व पात्र महिलांना शासनाच्या निर्णयाप्रमाणे मदत मिळणार आहे. महिलांनी या प्रक्रियेला समजून घेऊन काही अडचणी असल्यास स्थानिक पातळीवर अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












































































