Last Updated on 18 Nov 2023 5:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजारामबापू कारखान्याच्या बियाणे मळ्यात यंत्राचे प्रात्यक्षिक
कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडून साईचे कौतुक
आरआयटी कॉलेजच्या माध्यमातून पेटंट मिळवून देवू : प्रतीक पाटील
सांगली । वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील इयत्ता १२ वी (सायन्स) मध्ये शिकत असणाऱ्या साई निवास पाटील या विद्यार्थ्याने ऊसाची पाचट काढणारे देशी यंत्र तयार केले आहे.युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी कारखान्याच्या बियाणे मळ्यात त्यांच्या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहून त्यांचे कौतुक केले.यावेळी त्यांनी ‘आपले यंत्र शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून आपल्या यंत्राचा प्रसार करण्याबरोबर आरआयटी कॉलेजच्या माध्यमातून पेटंट मिळवून देवू,’असा विश्वासही व्यक्त केला.
प्रतिकदादा पाटील हे श्री गणेशोत्सव काळात येडेमच्छिंद्र येथे गेले असता युवक राष्ट्रवादी अध्यक्ष विशाल पाटील यांनी साईची ओळख व त्याच्या यंत्राबद्दल माहिती दिली.त्यावेळी त्यांनी कारखान्याचे ऊस विकास अधिकाऱ्यांना भेटायला सांगून माहिती घेण्यास सांगितले.त्यातून कारखान्याच्या बियाणे मळ्यात शेकडो प्रगतशील शेतकऱ्यांच्या साक्षीने या यंत्राचे प्रात्यक्षिक पहाण्यात आले.यावेळी प्रतिकदादांनी साईच्या देशी यंत्राबद्दल तोंड भरून कौतुक करून आपले पाठबळ व्यक्त केले.
याप्रसंगी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील,गटाधिकारी संग्राम पाटील,अभिजित कुंभार, रोहित साळुंखे,वडील निवास पाटील, येडेमच्छिंद्र येथील युवक राष्ट्रवादी अध्यक्ष विशाल पाटील,तेजस पाटील,अविनाश पाटील,विजय पाटील,राहुल पाटील, साखराळेचे विनोद बाबर,सचिन पाटील, प्रकाश पाटील,ऋतुराज चव्हाण (गौंडवाडी), रमेश जाधव (इस्लामपूर),दीपक पाटील (रेठरे धरण),गणेश पाटील (बहे), संभाजी पाटील (येडे निपाणी) यांच्यासह पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
ही आहेत या यंत्राची वैशिष्टये :
साई पाटील याने समाज माध्यमामध्ये परदेशातील ऊसाची पाचट काढणाऱ्या एका यंत्राचे प्रात्यक्षिक पाहिले.त्याने आपला छोटा व जुना ट्रॅक्टर,गिअर बॉक्स,नायलॉन केबल आदींचा वापर करून ऊसाची पाचट काढणारे देशी यंत्र तयार केले.या यंत्राचा वापर करीत असताना त्यास आलेल्या अनुभवातून त्याने काही दुरुस्त्याही केल्या आहेत.हे यंत्र एका दिवसात दोन एकर ऊसाची पाचट काढते.एकरी साडेतीन हजार रुपये आकारले जात आहेत.सध्या एक एकर पाचट काढायला रुपये ५-६ हजार खर्च येतो.सध्याच्या कमी मनुष्यबळाचा पार्श्वभूमीवर या यंत्राचे महत्व मोठे आहे.









































































