Last Updated on 09 Jan 2024 8:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । येथील कॉलेज वालचंद ऑफ इंजिनिअरिंगतर्फे आर्ट सर्कल अंतर्गत आयोजित ‘युवारंग’ उपक्रमातील चित्रकला स्पर्धेत येथील युवा चित्रकार प्रशिक पाटील याने प्रथम क्रमांक संपादन केला आहे.स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कक्षेतील विविध महाविद्यालयांमधील ५८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
संयोजकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुचवलेले रेखाटन प्रकारातील चित्र प्रशिकने नियोजित वेळेत पूर्ण केले.तो येथील कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग (आरआयटी) चा विद्यार्थी आहे.
तो कॉम्प्युटर सायन्सच्या तृतीय वर्षात शिकतो.आजवर त्याने अनेक पुस्तकांची आणि नियतकालिकांची मुखपृष्ठे व रेखाटने रेखाटली आहेत. यापूर्वी राज्यस्तरावरच्या अनेक चित्रकला स्पर्धांत त्याने यश मिळवले आहे.या यशासाठी त्याला आर. आय. टी. चे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले,विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. जुगुळकर,सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आर. जी. देसावळे,डॉ. श्रीकांत कारंजकर,डॉ. एस. एस. मगदूम यांचे मार्गदर्शन मिळाले.प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन,प्राचार्य प्रदीप पाटील,गणेश पोतदार आणि विजय नांगरे यांचे त्याला प्रोत्साहन मिळाले.













































































