Last Updated on 27 Aug 2023 6:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर । “मोबाईल फोन ही चौथी मूलभूत गरज बनली असून लोकांच्या शरीराचा अविभाज्य भाग बनला आहे.त्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक,मानसिक,कौटुंबिक,सामाजिक व भाषाशास्त्रीय दुष्परिणाम घडून येत आहेत.मोबाईल हे दुधारी शस्त्रासारखे असून विद्यार्थ्यांनी त्याचा विधायकपणेच वापर करावा.”असे प्रतिपादन प्रा. डॉ. राम घुले यांनी केले.
इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या जूनियर विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आयोजित “मोबाईल फोनचा वापर विद्यार्थ्यांसाठी किती फायद्याचा; किती तोट्याचा” या विषयावर ते बोलत होते.ते पुढे म्हणाले,”मोबाईल फोन व इंटरनेटने माहिती व तंत्रज्ञानात युगात मोठी क्रांती केली आहे. मोबाईल फोन आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रतीक बनला आहे.सतत मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्याच्या रेटिना थरावर ताण येऊन दृष्टी कमकुवत होते. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे इंटरनेट व मोबाईल फोनचा प्रचंड वापर वाढला.
शाळा महाविद्यालये ऑनलाईन सुरू होती. मोबाईल सक्तीचा झाला. त्यातूनच मोबाईलचे भयंकर व्यसन तरुणाईला जडले. मुलांची तर्कबुद्धी व बौद्धिक कौशल्य नष्ट होऊन ती गुगलवर अवलंबून राहू लागली. आभासी जगात मुले संवेदना शून्य बनली. स्मरणशक्ती कमी होऊन त्यांच्यातील स्वमग्नता वाढीस लागली भावना व जाणीव कमी होऊन ती एकलकोंडी बनवू लागली. वॉशरूम ते क्लासरूम असा मोबाईलचा प्रवास सुरू झाल्यामुळे फँटम पॉकेट कंपन, इंटरपर्सन सेन्सिटिव्हिटी, ऑबसेसिव्ह कंपल्स डिसऑर्डर अशा प्रकारच्या विकारांना बळी पडू लागली आहेत. मोबाईल वरील वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलांची झोप कमी होऊन त्यांची एन्झाईटी वाढत आहे. परिणामतः मेमरी लॉस सारखे दुष्परिणाम घडत आहेत. मुलं सायबर क्राईमला बळी पडत आहेत. त्यांचा स्ट्रेस बर्न आऊट होऊन आत्महत्ये सारखी टोकाची पावले उचलताना आढळत आहेत. पालकांनीही मुलांच्या इमोशनल ड्राम्याला भुलू नये. मोबाईलच्या व्यसनापासून सुटका करून घेण्यासाठी मुलांनी छंद जोपासावेत. पुस्तके वाचावीत. मैदानी खेळ खेळावेत. आई-वडील, सवंगड्यांसोबत निसर्गात जाऊन भ्रमंती करावी पालकांनी अँड्रॉइड फोन ऐवजी साधे मोबाईल फोन मुलांना द्यावेत.”
प्रास्ताविक करताना प्रा. राजेंद्र पाटील म्हणाले,”मुले वर्गात सर्रास मोबाईल वापरत आहेत त्यांच्याकडे शंभर रुपयांचे पुस्तक खरेदी करण्यासाठी पैसे नसतात परंतु पंधरा-वीस हजारचे मोबाईल जवळ असतात.” प्राध्यापक सचिन गरुड म्हणाले, “डिजिटल क्रांतीमुळे माहिती तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचले परंतु त्याचे दुष्परिणाम अधिक होताना दिसत आहेत.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. बी. पाटील होते.प्रा. डॉ.नितीन शिंदे,उपप्राचार्य एस. बी. पाटील,एम.टी. खंडेलोटे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफ हजर होता. सूत्रसंचालन जे. व्ही. कथलकर यांनी केले.आभार ए. वाय. मोहिते यांनी केले.व्याख्यानास पाचशे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.












































































