Last Updated on 23 Feb 2023 7:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याच्या निर्णयाची अंलबजावणी सन 2025 पासून करण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाने गुरुवारी ट्विट करून केली.या निर्णयानंतर परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सुरु केलेले आंदोलन मागे घेतले.या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाचे आभार मानले आहेत.
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सन 2023 पासून लागू करण्यात येत आहे, असे आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.‘या आंदोलनावर या उमेदवारांशी आम्ही संवाद साधला होता. त्यांच्याशी वारंवार बोलत होतो. उपमुख्यमंत्र्यानीही या तरुणांशी चर्चा केली होती. मंत्रीमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करून शासन या उमेदवारांच्या भावनांशी सहमत असल्याचे आयोगाला कळवण्यात आले होते. उमेदवारांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन आपण आयोगाकडे या नव्या परीक्षा पद्धतीसाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. आयोगानेही या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आयोगाला धन्यवाद देतो.’ असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.











































































