Last Updated on 03 Feb 2024 4:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आता आज नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.
हेही वाचा – …अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा गौरव
पंतप्रधानांनी X वर लिहिले केले आहे:
“मला हे सांगतांना अतिशय आनंद होत आहे की श्री लाल कृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाला आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. आपल्या काळातील एक अत्यंत आदरणीय असे मुत्सद्दी राजकारणीअसलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासातील योगदान अत्यंत महत्वाचे आहे.अगदी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात झाली आणि तो आलेख, देशाचे उपपंतप्रधान होण्यापर्यंत उंचावत गेला. गृहमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती. संसदेतील चर्चेदरम्यान, त्यांचे वर्तन आणि त्यांची भाषणे, अनुकरणीय तसेच अत्यंत समृद्ध अशी दृष्टी देणारी होती.
सार्वजनिक जीवनातील कित्येक दशकांची त्यांची दीर्घ सेवा,पारदर्शकता आणि अढळ निष्ठा या मूल्यांप्रति समर्पित होती, त्यांच्या या जीवनकार्यातून त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी राजकीय नीतीमत्तेचा नवा आदर्श ठेवला.राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्यात तसेच,देशाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत.त्यांना भारतरत्न प्रदान होणे, हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अनंत संधी मला मिळाल्यात, हे मी नेहमीच माझे भाग्य समजतो”.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे 8 नोव्हेंबर 1927 रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद अडवाणी आणि आईचे नाव ग्यानी देवी आहे.त्यांचे वडील व्यवसायाने उद्योजक होते त्यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल, कराची येथून झाले. यानंतर त्यांनी डीजी नॅशनल स्कूल, हैदराबाद, सिंधमध्ये प्रवेश घेतला.
अडवाणींना 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सवही साजरा करता आला नाही. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांना आपले घर सोडून भारतात जावे लागले.फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबईत स्थायिक झाले.येथे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले.
अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक वर्षे अडवाणी राजस्थानमध्ये संघाच्या प्रचारकाच्या कामात गुंतले होते. भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
1980 ते 1990 या काळात अडवाणींनी भाजपला राष्ट्रीय पातळीवरील पक्ष बनवण्याचे काम केले लालकृष्ण अडवाणी हे तीन वेळा (1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत.1984 मध्ये केवळ दोन जागा जिंकणाऱ्या या पक्षाला पुढील लोकसभा निवडणुकीत 86 जागा मिळाल्या.पक्षाची स्थिती 1992 मध्ये 121 आणि 1996 मध्ये 161 पर्यंत पोहोचली.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली आणि भाजप सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून पुढे आला.
ते 1998 ते 2004 दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये गृहमंत्री होते.लालकृष्ण अडवाणी यांनी 2002 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते.10 व्या आणि 14 व्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका चोख बजावली आहे. 2015 मध्ये, त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.












































































