Last Updated on 14 Mar 2024 10:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 2 रुपयांची कपात केली आहे.उद्या सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजेच 15 मार्चपासून नवीन दर लागू होतील
लोकसभा निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
X वरील एका पोस्टमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की,“पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय आहे.”
जग सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे.विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या दरात 50 ते 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांना पेट्रोल मिळणेच बंद झाले आहे. गेल्या 50 वर्षात इतके मोठं तेलसंकट कधीच उद्भवले नव्हते तशी परिस्थिती आता आहे.असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि चांगल्या नेतृत्वामुळे मोदींच्या या कुटुंबाला कोणतीही अडचण आली नाही”, असेही हरदीप पुरी म्हणाले आहेत.
दरम्यान,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी गेल्या 7 दिवसात दोन निर्णय घेतले आहे. याआधी 8 मार्च महिला दिनानिमित्त एलपीजी गॅस 100 रुपयांनी स्वस्त केला होता आणि आज आचारसंहिता लागण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल प्रतीलिटर 2 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.












































































